मुंबई : शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी अध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर, पुढील नेतृत्व कोणाकडे जाणार याबाबत विविध चर्चांना उधाण आले होते. अखेर या चर्चांना पूर्णविराम देत खुद्द शरद पवार यांनी शिंदे यांच्या नावाची घोषणा केली.
हा निर्णय मुंबईतील वाय. बी. चव्हाण केंद्रात पार पडलेल्या पक्षाच्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला. बैठकीला शरद पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे आणि इतर नेते उपस्थित होते. यावेळी अनिल देशमुख यांनी शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि तो एकमताने मंजूर करण्यात आला.
आता शिंदे यांच्यासमोर पक्षाला आगामी महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत यशाकडे नेण्याचे मोठे जबाबदारीचे आव्हान असणार आहे.
जयंत पाटील यांच्यानंतर शशिकांत शिंदे यांची निवड ही पक्षाच्या पुढील रणनीतीच्या दृष्टीने निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.