Published On : Wed, Oct 24th, 2018

शैक्षणिक स्तर वाढविण्यासाठी विज्ञान केंद्र उपयोगी ठरेल

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर वाढविण्यासाठी विज्ञान केंद्र उपयोगी ठरतील, असा विश्वास शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांनी व्यक्त केला. नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने एचसीएल फाऊंडेशन व स्वप्नभूमी संस्थेच्या सहकार्याने महानगरपालिकेच्या रमाबाई आंबेडकर उच्च प्राथमिक शाळेत विज्ञान केंद्र तयार करण्यात आले. या विज्ञान केंद्राचे उद्‌घाटन बुधवारी (ता.२४) करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर बसपा गट नेते मोहम्मद जमाल, नगरसेविका विरंका भिवगडे, मंगला लांजेवार, नगरसेवक मनोज सांगोळे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त रवींद्र देवतळे, एचसीएल फाऊंडेशनच्या निधी पुंधीर, एचसीएल नागपूरचे शैलेश आवळे, स्वप्नभूमीचे संस्थापक सूर्यकांत कुळकर्णी, आशीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रा.दिवे म्हणाले, नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी हा गरीब कुटुंबातील आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी गुण असून त्याला बाहेर वाव मिळत नाही. विद्यार्थ्यांमधील गुणांना वाव मिळावा, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. अशा प्रकारच्या विज्ञान केंद्रातून महानगरपालिका शाळांतील विद्यार्थी घडतील असा मला विश्वास आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संकल्पना अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितली. मान्यवरांचे स्वागत शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन मधू पराड यांनी केले. तर आभार ज्योती मेडपल्लीवार यांनी केले.