Published On : Mon, Feb 8th, 2021

कोरोनाचे नियम पाळत इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू

शिक्षण सभापती, शिक्षणाधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

नागपूर: महाराष्ट्र शासनातर्फे जारी करण्यात आलेल्या कोरोना संरक्षणात्मक सर्व दिशानिर्देशांचे पालन करीत सोमवार (ता.८) पासून नागपूर शहरातील सर्व शाळांमधील इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. मनपाचे शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे व शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर यांनी मनपाच्या वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे फुल देउन स्वागत केले.

घरी बसून ऑनलाईन पद्धतीने धडे गिरविणारे विद्यार्थी तब्बल १० ते ११ महिन्यांनी शाळेत पोहोचले. मोबाईलच्या स्क्रिनवर भेटणारे मित्र, मैत्रिणी आज प्रत्यक्षात एकमेकांना पाहताच आनंदून गेले. हा आनंद कायम ठेवित सुरक्षेची संपूर्ण काळजी घेत मनपाच्या ८९ शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गखोल्यांमधून प्रार्थना, कवितांचे सुर घुमू लागले. वर्गामध्ये एका टेबलवर एक विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली.


यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी त्यांना सुरक्षेबाबत कुठलीही बेजबाबदारी न बाळगण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मनपाद्वारे सर्व काळजी घेण्यात येत असून सर्व विद्यार्थ्यांनी नियमितपणे शाळेत यावे व आपला अभ्यासक्रम पूर्ण करावा असेही ते म्हणाले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळच असून त्यांनीही अभ्यासात सातत्य कायम ठेवावे, मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मनपाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादीत करण्यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.

इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गांनंतर आता शासनाच्या दिशानिर्देशानुसार इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होत आहेत. प्रत्येक शाळेमध्ये मनपाने विशेष तयारी केली असून प्रत्येक विद्यार्थी सोशल डिस्टन्सिंग राखून शाळेमध्ये येतो आहे. त्यानंतर त्याची थर्मल स्क्रिनिंग, ऑक्सिजन तपासणी केली जाते. सॅनिटाईज करून वर्गामध्ये प्रवेश दिला जातो. शाळेमध्ये विद्यार्थी येण्यापूर्वी त्यासंबंधी पालकांनी संमतीपत्र देणे मनपाद्वारे अनिवार्य करण्यात आले आहे. मनपाच्या शाळांमध्ये पहिल्याच दिवशी मोठया संख्येत विद्यार्थी उपस्थित असल्याची माहिती यावेळी शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर यांनी दिली. यावेळी माजी शिक्षणाधिकारी श्रीमती संध्या मेडपल्लीवार सुध्दा उपस्थित होत्या.