Published On : Mon, Feb 8th, 2021

‘साई’च्या जागेवरील अतिक्रमणधारकांवर गुन्हे दाखल करा : महापौर दयाशंकर तिवारी

‘साई’ क्रीडा संकुलाच्या कामाचा महापौरांनी घेतला आढावा

नागपूर : शहरात राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई)ला १४०.७७ एकर जमीन ३० वर्षासाठी लीजवर दिली आहे. मात्र या प्रस्तावित जमिनीवर नागरिकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. यासंबंधी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सोमवारी (ता. ८) संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपाच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे (एफआयआर) दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच अतिक्रमण करून घरे बांधणाऱ्या नागरिकांना २४ तासाचे नोटीस देऊन त्यांच्या विरुध्द मनपा व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एन.एम.आर.डी.ए.) ची संयुक्त कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

महापौर कक्षात झालेल्या बैठकीत उपमहापौर मनीषा धावडे, आमदार गिरीश व्यास, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार सागर मेघे, आमदार प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, सत्तापक्ष प्रतोद दिव्या धुरडे, क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, उपायुक्त मिलिंद मेश्राम, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणचे नागपूरचे प्रमुख वीरेंद्र भांडारकर, ओम असोसिएटचे शरद पिंपळे आदी उपस्थित होते.

‘साई’च्या कामाबाबत लवकरात लवकर अंतिम निर्णय घेउन कार्यवाही करण्यासंदर्भात महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपा आयुक्त, एनएमआरडीचे सभापती, नेहरूनगर झोनचे सहाय्यक आयुक्त तसेच संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलविण्याचे निर्देश दिले.

संयुक्त कारवाई करून अतिक्रमण हटविण्यात यावे : आमदार कृष्णा खोपडे
बैठकीला उपस्थित आमदार कृष्णा खोपडे म्हणाले, नागपूर शहरात राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण संस्था स्थापन करणे हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ‘ड्रिम प्रोजेक्ट’ आहे. तसेच हा प्रकल्प केंद्र सरकारचा असून या प्रकल्पाशी राज्य सरकारचा काहीही संबंध येत नाही. गेल्या काही वर्षात अनेक लोकांनी अवैधरित्या या जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधली. आता अतिक्रमणधारकांची संख्या आणखी वाढली आहे. त्यामुळे या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी पोलिस बळाचा वापर करून संयुक्त कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी सूचित केले.

अतिक्रमणावर त्वरित कारवाई करा : आमदार प्रवीण दटके
साई‘च्या प्रस्तावित जमिनीवर झालेल्या अतिक्रमणावर त्वरित कारवाई करण्याची सूचना यावेळी आमदार प्रवीण दटके यांनी केली. संबंधित प्रकल्प केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ‘ड्रिम प्रोजेक्ट‘ असून यासाठी लागणारा संपूर्ण निधी केंद्र सरकार कडून मिळत असल्यामुळे या जमिनीवर आणि प्रकल्पाशी राज्य सरकारचा काहीच संबंध नाही, असेही दटके म्हणाले. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली मनपा आयुक्त, एनएमआरडी आयुक्त, नेहरूनगर झोनचे अतिरिक्त आयुक्त, संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची सूचना प्रवीण दटके यांनी यावेळी केली.

चांगले खेळाडू तयार करण्यासाठी महत्वपूर्ण प्रकल्प : वीरेंद्र भांडारकर, साई
नागपूर शहरात चांगले खेळाडू तयार करण्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे. प्रकल्प पूर्ण न झाल्यास नागपूर सोबतच संपूर्ण विदर्भातील युवक, खेळाडू आणि प्रशिक्षकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. या प्रकल्पात शाळा, क्लब हाउस, स्विमिंग पूल, अभ्यासिका, प्रत्येक खेळाचे मैदान तसचे विविध खेळासंबंधी अनेक क्रीडा सुविधा असणार आहेत, असे साई नागपूर चे प्रमुख वीरेंद्र भांडारकर यांनी सांगितले. तसेच लवकरात लवकर काम सुरू करण्यासाठी संबंधित जमिनीवरील अतिक्रमण हटवून अतिक्रमणरहीत जमीन देण्याची मागणी वीरेंद्र भांडारकर यांनी महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे केली. या प्रकल्पासाठी रु १४० कोटीचा प्रावधान करण्यात आला आहे.

शहरात राष्ट्रीय प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणला १४०.७७ एकर जमीन ३० वर्षासाठी लीजवर देण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली होती. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ६६(१०) नुसार क्रीडा धोरणाला चालना देण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणच्या माध्यमातून महानगरपालिका क्षेत्रात प्रशिक्षण केंद्र व राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण संस्था स्थापना केली जाणार आहे. या माध्यमातून उदयोन्मुख खेळाडू व प्रशिक्षकांना एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी मौजा वाठोडा येथील २८.४६ एकर व तरोडी खुर्द येथील ११२.२९ एकर जमीन प्रस्तावित केली होती, ही माहिती उपायुक्त श्री. मिलींद मेश्राम यांनी दिली.