नागपूर : दोन महिन्याच्या उन्हाळी सुटीनंतर आजपासून शहरातील शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेची पहिली घंटा वाजली. पहिल्याच दिवशी सवंगड्यांना भेटण्याची ओढ, नवीन गणवेश आणि शालेय साहित्य मिळाल्याने चेहऱ्यावर पसरलेला आनंद विद्यार्थांमध्ये पाहायला मिळाला.
तर काहींमध्ये असलेली शाळेची भीती, आई-बाबांपासून दूर जायचे म्हणून कोसळलेले रडू अशा संमिश्र वातावरणात शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांचा किलबिलाट पाहायला मिळाला. हे सर्व पाहून शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते.
उन्हाळी सुटीनंतर २०२३-२४ शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी शाळांना शिक्षण विभागाकडून विविध सूचना देण्यात आल्या. शाळा ३० जूनपासून सुरू होतील, असे पूर्वीच सांगण्यात आले होते. त्यानुसार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहत, शाळांची स्वच्छता, सौंदर्यीकरण केले . शिक्षण विभागाने शाळा सुरू होण्याच्यापूर्वीच पाठ्यपुस्तके, गणवेशांचे नियोजन करण्यात आले.