नागपूर : राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती अधिकच गहिरावत चालली आहे. या प्रकरणात गोंदिया जिल्ह्यातून आणखी एका मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या आता १५ वर पोहोचली आहे.
विशेष तपास पथकाने (SIT) बुधवारी रात्री गोंदिया जिल्ह्यातील मरदोली गावातून धनराज हुकरे या आरोपीला अटक केली. तो एका शिक्षण संस्थेचा सचिव असून, देवरी येथील शिवराम विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्याच्यावर शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने बनावट कागदपत्रांच्या आधारे दोन शिक्षकांची बोगस भरती केल्याचा आरोप आहे. या शिक्षकांनी बनावट शालार्थ आयडीचा वापर करून सेवा बजावली होती, अशी माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.
धनराज हुकरे याचे वडील हे भीमाबाई शिक्षण संस्थेचे संस्थापक होते. सदर संस्था सध्या दोन कॉलेज आणि दहा शाळा चालवते. हुकरे या संस्थेचा सचिव म्हणूनही जबाबदारी सांभाळत होता.
ही कारवाई पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे आणि पोलीस उपनिरीक्षक संतोष शिरडाले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. अटकेनंतर धनराज हुकरे याला नागपूर न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्याला २६ जुलै, शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या अटकेनंतर एकूण १५ आरोपींवर कारवाई झाली असून, पोलिसांकडून इतर आरोपींचा शोध सुरु आहे. पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.