Published On : Tue, Jul 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

सावनेरमधील वृद्धेच्या हत्येचा ९ दिवसांत उलगडा;ओळख पटण्याआधीच आरोपीला अटक

Advertisement

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सावनेर परिसरात एका अज्ञात वृद्ध महिलेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी नागपूर ग्रामीण पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकार परिषदेत या गुन्ह्याचा उलगडा करत आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, २७ जूनच्या रात्री रस्त्यावर एकटी चालत असलेल्या वृद्ध महिलेला आरोपीने दुचाकीवर बसवून निर्जन ठिकाणी नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केल्यानंतर हातापायांनी अमानुष मारहाण करून तिची हत्या करण्यात आली. या गुन्ह्यात कोणत्याही शस्त्राचा वापर झाल्याचे तपासात आढळून आलेले नाही.

या प्रकरणात पोलिसांनी भोकारा येथील ४८ वर्षीय सुधाकर दादाराव मंडपे याला अटक केली. सुरुवातीला आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि सखोल चौकशीच्या आधारे त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली. गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्प्लेंडर दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.

तपासादरम्यान खापरखेडा येथील विनोद भिंगारे आणि सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. घटनेच्या एक दिवस आधी त्यांनी काढलेले वृद्ध महिलेचे छायाचित्र पोलिसांसाठी महत्त्वाचा धागा ठरले. त्याच छायाचित्रासह सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले.

Advertisement

पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले की, अवघ्या नऊ दिवसांत आरोपीला अटक करण्यात यश आले असले, तरी मृत वृद्ध महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. तिची शिनाख्त करण्यासाठी आणि प्रकरणातील इतर बाबींचा तपास सुरू असून नागरिकांनी संबंधित महिलेबाबत माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.