Published On : Sat, Jun 2nd, 2018

गांधीबाग उद्यानात ‘व्यापारी संकुल’ उभारण्याची मनपाला ‘घाई’, नागरिकांचा तीव्र विरोध!


नागपूर: शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले गांधीबाग उद्यान हे परिसरातील नागरिकांच्या विरंगुळ्याचे ठिकाण आहे. येथील आबालवृद्धांच्या दिनचर्येत या बागेला एक वेगळे स्थान आहे. विशेष म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व त्यांच्या अनुयायांनी महात्मा गांधींच्या आवाहनावरून श्रमदानाद्वारे गांधीबाग उद्यानाच्या निर्मितीत आपले योगदान दिल्याची आठवण काही जेष्ठ नागरिक सांगतात. असे ऐतिहासिक महत्व असलेल्या या बागेचा काही भाग नष्ट करून तेथे व्यापारी संकुल उभारण्याचा विडा महापालिकेने उचलला आहे. मात्र या सर्व प्रकाराला नागरिकांनी वारंवार तीव्र विरोध दर्शवला आहे. तसेच गांधीबाग बगीचा बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून आता नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या विरोधात मोठे जन-आंदोलन छेडले आहे.

सदर उद्यान हे ५ एकरावर पसरले असून त्याच्या १.५ एकराचा व्यावसायिक उत्पन्नासाठी वापर करण्याचा नागपूर महापालिकेचा मनसुबा आहे. याच दरम्यान सन २०१६ मध्ये बागेतील ६७०० फूट जागेऐवजी ६९३६० फूट जागेचे उपयोगिता भूखंडात (user change) तडकाफडकी रूपांतर करण्यात आले. तसेच आता या जागेवर ९ मजली गगनचुंबी व्यापारी संकुल इमारत बांधण्याची घाई मनपा प्रशासनाला झाली आहे.

नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक कार्यक्रम आणि पत्रपरिषदांमध्ये शहरात ठिकठिकाणी नागरिकांसाठी उद्याने आणि क्रीडांगणे निर्माण करण्याचा मानस नेहमीच बोलून दाखवला आहे. परंतु महापालिका प्रशासनाची वरील कृती मात्र अगदी याउलट दिसते आहे.


आधीच मध्य नागपूर हे तसे ऐसपैस आणि प्रशस्त नाही. त्यात आता बाजूने मेट्रोची ये-जा होईल, काही अंतरावर मेट्रोचे स्थानक देखील आहे. बाजूला आठवडी व किरकोळ बाजार देखील आहे ज्याला मनपाच्या अग्निशमन विभागाने असुरक्षित घोषित केले आहे. रस्त्यांची रुंदी देखील नियमाप्रमाणे नाही. त्यात मनपा अग्निशमन विभागाने मंजुरी नाकारली असताना राज्य सरकारच्या अग्निशमन विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळवले गेले.

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अनेक निर्णयांमध्ये स्पष्ट केले आहे की, अत्यंत अपवादात्मक प्रकरणातच user change चा वापर केला जावा. तसेच यासाठी संबंधित परिसरात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रहिवासी नागरिकांसोबत बैठक घ्यावी आणि पर्यावरणाला नुकसान होत असल्यास user change केला जाऊ नये, असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परंतु न्यायालयाचे निर्देश व पर्यावरणाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून मनपा प्रशासन आपला हेतू सिद्ध करण्यास उतावीळ झाले आहे.

त्यामुळे उद्यान परिसर आणि शहरातील अनेक नागरिकांनी सदर उद्यानाच्या बचावासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी भव्य स्वाक्षरी अभियान व मनपा अधिकाऱ्यांना निवेदन, गांधीबाग उद्यानाच्या सभोवती मानव शृंखला व मनपा नेत्यांच्या निवासस्थानांसमोर धरणे आंदोलन इत्यादी मार्गांनी नागरिक आपला विरोध दर्शवत आहेत.

—Narendra Puri