Published On : Thu, Oct 8th, 2020

सत्यनारायण नुवाल नव उद्योजकांसाठी प्रेरणास्थान- डॉ. राऊत

आकाश तसेच पिनॅकल क्षेपणास्त्र, आरडीएक्स स्फोटकाशिवाय सैन्यदलाला लागणाऱ्या विविध आयुधांसाठीचा पूरक दारुगोळा तयार करणारे सोलर एक्सप्लोजिव्हचे प्रवर्तक सत्यनारायण नुवाल विदर्भातील नवउद्योजकांचे प्रेरणास्थान ठरले आहेत, असे गौरवोद्गगार पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज काढले .

कोविड-19 मुळे संपूर्ण उद्योगविश्वाला इतर व्यवसायांप्रमाणे मोठया प्रमाणात झळ बसली आहे.अनेक जणांचा रोजगार हिरावला गेला आहे. अशा काळात ‘सोलार एक्सप्लोजिव्ह’ यांनी सर्व शासकीय नियमांचे पालन करीत आपली उद्योगाची वाटचाल सुरु ठेवली. संरक्षण विभागाने नुकताच त्यांना 409 कोटीचा 10 लक्ष रुपयांचा हॅन्ड ग्रेनेड निर्माण करण्याचे कंत्राट दिले आहे. यामुळे विदर्भातील अनेक बेरोजगारांना याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ होणार आहे. नागपूर व परिसरात या उद्योगसमूहांमुळे संरक्षण विभागाच्या पूरक उद्योगाला चालना मिळाली आहे.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने सत्यनारायण नुवाल यांच्या कार्याची दखल घेवून बचत भवन सभागृहात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आभासी माध्यमातून बैठकीला उपस्थित होते. उद्योग क्षेत्रातील विदर्भ इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी, बुट्टीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल, एमआयडीसी इंडस्ट्रिज असोसिएशन, (हिंगणा ) चंद्रशेखर शेगांवकर तसेच विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे , पोलीस अधीक्षक राकेश ओला, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सत्कारमूर्ती श्री. नुवाल यांचा सत्कार करताना पालकमंत्री म्हणाले, कोरोनामुळे उद् भवलेल्या लॉकडाऊन परिस्थितीत उद्योजक सत्यनारायण नुवाल यांनी ‘सोलार एक्सप्लोजिव्ह’ उद्योग समूहाच्या माध्यमातून कोरोना काळातील सर्व प्रोटोकॉल पाळत, अनेकांना रोजगार दिला आहे. त्यांच्या मुळे संपूर्ण देशात नागपूर शहराचा नावलौकिक वाढला आहे. प्रामाणिकतेला उद्यमशीलतेची जोड मिळाल्यानंतर काय ‘अविष्कार ‘ तयार होतो, याचे उत्तम उदाहरण सत्यनारायण नुवाल आहेत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या कारकीर्दीत विदर्भाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात आयुध निर्माणीचे काम सुरू झाले. त्यानंतर विदर्भाच्या भूमीत संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करण्याचे श्रेय देखील सत्यनारायण नुवाल यांना जाते.

नवी दिल्ली येथून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील सत्यनारायण नुवाल यांच्या उद्यमशीलतेचे व त्यांनी विदर्भात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला. एखादा उद्योग बंद होतो, तेव्हा सामाजिक प्रश्न निर्माण होतात. कोरोना आणीबाणीच्या काळात सामान्य माणसाला रोजगार मिळावा, तरुणांच्या हाताला काम मिळावे, यासाठी सत्यनारायणजी यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. पुढील काळात मिहान परिसरात मोठ्या प्रमाणात संरक्षण खात्याशी संबंधित पूरक उद्योग वाढीला वाव आहे. अशा कंपन्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. याची एक सुरुवात सत्यनारायणजी यांच्या उद्योगसमूहाच्या मार्फत नागपुरात होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

यावेळी विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी कोणताही प्रगत समाज हा उद्योग समूहांना दुर्लक्षित करू शकत नाही. कारण उद्योग समूहाशिवाय प्रगती शक्य नाही. त्यामुळे कोरोना कालावधीत देखील हळूहळू सर्व उद्योग समूह सुरू होण्यासाठी प्रयत्न करणे अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले.

व्यासपीठावरील अन्य मान्यवरांनी देखील यावेळी सत्यनारायण नुवाल यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. एक उद्योजक म्हणून त्यांनी उद्योग जगतातील अनेकांना केलेल्या मदतीचा देखील यावेळी उल्लेख करण्यात आला. पालकमंत्री नितीन राऊत यांनी यावेळी त्यांना शाल-श्रीफळ व मानचिन्ह देऊन प्रशासनाच्या वतीने सत्कार केला. शहरातील उद्योग समूहातील मान्यवर व वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले. उद्योग जगतातील सर्व समूहासोबत कोरोना काळामध्ये जवळून काम करता आले. या काळात उद्योगसमूहांनी प्रशासनाला अतिशय उत्तम साथ दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन उद्योग विभागाचे महाव्यवस्थापक गजेंद्र भारती यांनी केले.