Published On : Thu, Oct 8th, 2020

सकारात्मक विचार आणि दृष्टीकोन महत्वाचा

Advertisement

‘कोव्हिड संवाद’मध्ये डॉ. अभिषेक सोमानी आणि डॉ.सुलेमान विरानी यांचा सल्ला

नागपूर : कुठल्याही माणसाच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण ही त्याच्या विचाराच्या पायावर आधारित असते. त्यातूनच त्या व्यक्तीचा दृष्टीकोन विकसित होत असतो. त्यामुळेच सकारात्मक विचार आणि सकारात्मक दृष्टीकोन कधी नव्हे इतका आजच्या कोव्हिडच्या काळात अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळेच सकारात्मक आणि आशावादी राहा, असा सल्ला प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अभिषेक सोमानी आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुलेमान विरानी यांनी दिला.

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतील ‘कोव्हिड संवाद’ फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात गुरूवारी (ता.८) डॉ. अभिषेक सोमानी आणि डॉ. सुलेमान विरानी यांनी ‘कोव्हिड आणि मानसिक ताणतणाव’ या विषयावर मार्गदर्शन केले आणि नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसरन केले.

कोव्हिड ही जागतिक महामारी आहे. यामुळे अनेकांच्या मनावर परिणाम झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनने अनेकांच्या हातचा रोजगार गेला. कुटुंबाची जबाबदारी, डोक्यावरील कर्जाचे ओझे यातून नैराश्य आले. रात्री झोप न लागणे, सतत नकारात्मक विचार येणे अशा समस्या घेउन येणाऱ्या नव्या रुग्णांची मनोसोपचार तज्ज्ञांकडील संख्या वाढत आहे. अनेक जण मानसिक ताणतणावामध्ये जगत आहेत. मी बाहेर गेल्यास मला कोरोना होईल म्हणून घरातच बसून असणारे तर मला काही होत नाही म्हणून कुठलीही सुरक्षा साधने न वापरता घराबाहेर फिरणारे असेही लोक समाजात दिसत आहेत. या दोन्ही विचारसरणी आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाहीत. त्यामुळे काम असल्यास घराबाहेर निघा, मात्र मास्क, सॅनिटायजर या साधनांचा वापर करूनच आणि विशेष म्हणजे प्रत्येक व्यक्तीशी सुरक्षेचे अंतर राखा. मला काही होत नाही हा गैरसमज कुणीही ठेवू नका, कोरोना कुणालाही होऊ शकतो. कोरोना हा अत्यंत धोकादायक विषाणू आहे. कोरोनामधून बरे झालेल्यांना पुढील काही महिने त्याचा त्रास सहन करावा लागतो. ती वेळ येऊ नये म्हणून प्रत्येकाने नियमांचे पालन करा, सतर्क राहा, सुरक्षित राहा, असे आवाहन डॉ. अभिषेक सोमानी आणि डॉ. सुलेमान विरानी यांनी केले.

कोव्हिडच्या संकटाने आपल्याला अनेक सकारात्मक गोष्टी शिकविल्या आहेत. त्यांच्या संधी म्हणून उपयोग करा. कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता येत आहे. अशात गृहिणींना कामाचा ताण येत असल्याचे दिसून येतो. त्यामुळे घरातील प्रत्येकाने कामाचे विभाजन करा. घरात आनंद यायला छोट्या छोट्या गोष्टींचे निमित्त आवश्यक असते, त्यामुळे आनंदी राहा. आपले छंद जोपासायला पुरेपूर वेळ कोव्हिडने दिला आहे त्याचा उपयोग करा. आपल्या गरजा कमी करून कमी पैशातही जीवन व्यतित करता येते हा मोठा संदेशही कोव्हिडने दिला आहे. त्यामुळे जीवनशैली त्यादृष्टीने बदला. नकारात्मक विचारांना दूर ठेवण्यासाठी सर्वात आधी मनातून भीती काढून घ्या. सोशल मीडिया हे आभासी जग यातून बाहेर निघा. कोव्हिडचे वास्तव स्वीकारा, त्यापासून बचावाचे नियम पाळा. सकारात्मक विचार करा. आपल्या रोजच्या गोष्टी, घटनांकडे सकारात्मकतेने पाहा आपला दृष्टीकोनही सकारात्मक होईल, असाही मोलाचा संदेश डॉ. अभिषेक सोमानी आणि डॉ. सुलेमान विरानी यांनी यावेळी दिला.