Published On : Sun, Apr 29th, 2018

संताजी जगनाडे महाराजांच्या स्मारकासाठी 1 कोटी देणार – मुख्यमंत्री

नागपूर: संत तुकाराम महाराजांची गाथा पोहोचविण्याचे काम संताजी जगनाडे महाराजांनी केले आहे. समाजातील सर्व लोकांना एकत्रित करुन सर्वधर्म समभावाचे विचार त्यांनी समाजात रुजविले. अशा महान संताचे आचार-विचार जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांचे स्मारक उभारण्यासाठी 1 कोटी रुपये देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तेली समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात दिली.

येथील एरंडेल तेली हितकारिणी मंडळाच्यावतीने आयोजित सामूहिक विवाह सोहळा प्रसंगी ते नवविवाहित वर-वधुंना शुभार्शिवाद देताना बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, जयदत्त क्षिरसागर, महापौर नंदाताई जिचकार, आयोजक समितीचे प्रशांत काबंळे, देवेंद्र कैकाळे यांच्यासह हितकारिणी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, अतिशय सुरेख सामूहिक विवाह सोहळा आयोजन केल्यानिमित्त तसेच विवाहबध्द झालेल्या नवविवाहिताना त्यांनी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याच्या निमित्त परिणयबध्द झालेल्या विवाहिताना मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या मान्यवरांनाकडून आर्शिवाद मिळाले आहे. संताजी जगनाडे महाराजांनी सर्वधर्म समभावाची शिकवण समाजाला दिली आहे. त्यांचे आचार- विचार प्रत्येक नागरिकांनी आपल्या आचरणात आणावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या सामुहिक विवाह सोहळ्याला तेली समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.