नागपूर: नागपूर शहरात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत व त्यानंतरही नागपूर महानगरपालिकाद्वारे केले जाणारे सेवेचे कार्य निरंतर सुरूच आहे.
दोन दिवस लागोपाठ झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये पाणी जमा झाले होते. काही ठिकाणी झाडे पडली होती. अग्निशमन जवानांनी अनेकांना सुखरुप बाहेर काढले. यादरम्यान मनपाच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाचे व स्वच्छता विभागाच्या पथकाच्या जवान कार्यरत होते.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, श्रीमती वैष्णवी बी. यांच्या मार्गदर्शनात मनपाची संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे. त्यानुसार शहरातील सोमलवाडा मनीष नगर अंडरपास, नरेंद्र नगर रेल्वे पुलाखाली, चिंचभवन वर्धा रोड, मिनिमाता नगर बायपास अंडरपास, सीताबर्डी उड्डाणपूल आदी विविध ठिकाणी नियमित स्वच्छतेसोबतच पावसामुळे जमा झालेला गाळ ही काढण्यात आला.
मनपाचे मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी स्वतः विविध ठिकाणी भेट देऊन कार्याचे अवलोकन केले. यावेळी झोनचे सहायक आयुक्त व झोनल अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून कार्य केले. याकरिता दहाही झोनच्या कचरा संकलन वाहनांनी मदत घेण्यात आली. तसेच काही अंडरपासच्या स्वच्छतेसाठी स्वच्छता मशीनचा वापर केला जात आहे.