नागपूर : १७ मार्च रोजी गांधीगेट परिसरात झालेल्या दंगल प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खान (Fahim Khan) याला अखेर जामीन मंजूर झाला आहे. शुक्रवारी सेशन कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि काही अटींसह त्याची जामिनावर मुक्तता केली आहे.
कोर्टाने घालून दिलेल्या अटींमध्ये, फहीम खान याला प्रत्येक दुसऱ्या दिवशी संबंधित पोलिस ठाण्यात हजेरी लावणे आवश्यक आहे.
काय घडले होते?
१७ मार्च रोजी नागपूर शहरातील गांधीगेट परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या प्रतीकात्मक कबरीचे दहन केल्याची घटना घडली. यावेळी धार्मिक चादर जळाल्याची माहिती समोर येताच मुस्लिम समाजात तीव्र संताप उसळला.
संध्याकाळी मोमिनपुरा, तकिया, अंसारनगर, डोबी व भालदारपुरा भागातून मोठ्या प्रमाणावर गर्दी जमू लागली. या जमावाने गांधीगेटकडे कूच करत दगडफेक आणि जाळपोळ सुरू केली. हंसपुरी, महाल, भालदारपुरा या भागातील हिंदू समाजाच्या घरांवर हल्ले करण्यात आले.
दंगलीदरम्यान १०० हून अधिक घरे आणि वाहने उद्ध्वस्त झाली. काही सरकारी वाहने आणि क्रेनही जाळण्यात आली. दंगल थांबवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, मात्र उपद्रवी तलवार, चाकू, लाठ्यांनी सज्ज होते.
या हिंसाचारात तीन डीसीपीसह १३५ पेक्षा अधिक पोलिस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी या प्रकरणी १५० पेक्षा अधिक जणांना अटक केली होती. त्यात फहीम खान हा मुख्य आरोपी होता. त्याच्यावर एनएसए अंतर्गतही कारवाई करण्यात आली होती.
आधीही मिळालेल्या दोन खटल्यात जामिन-
फहीम खानवर गणेशपेठ, तहसील आणि सायबर पोलिस ठाण्यांमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत. एक महिना आधी दोन वेगवेगळ्या प्रकरणांत त्याला जामीन मिळाला होता. कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल प्रकरणात त्याने जामिनासाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती.
फहीम खानने याचिकेत स्वतःवरील आरोप खोटे असल्याचे सांगत निर्दोष असल्याचा दावा केला होता. मागील महिन्यात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. अखेर शुक्रवारी निकाल देताना न्यायालयाने त्याला अटींसह जामीन मंजूर केला.