Published On : Mon, Apr 23rd, 2018

नवे सभापती देतील विकासाला नवा आयाम : महापौर

Advertisement

Mayor

नागपूर: मंगळवारी झोनच्या नवनिर्वाचित सभापती ह्या विकासकामांच्या बाबतीत जागरुक आहेत. विकासकामे खेचून आणण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड असते. सभापती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मंगळवारी झोनमधील विकासकामांना त्या नव्या आयाम देतील, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.

मंगळवारी झोन कार्यालयात आयोजित झोनच्या नवनियुक्त सभापती संगीता गिऱ्हे यांच्या पदग्रहण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर आमदार सुधाकर देशमुख, आमदार डॉ. मिलिंद माने, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती विरेंद्र कुकरेजा, माजी सभापती सुषमा चौधरी, दुर्बल घटक समितीचे सभापती महेंद्र धनविजय, स्थायी समितीचे माजी सभापती संदीप जाधव, नगरसेवक संजय बुर्रेवार, नरेंद्र वालदे, नगरसेविका अर्चना पाठक, रश्मी धुर्वे, गार्गी चोपरा, स्नेहा निकोसे, ममता सहारे, भाजप पश्चिम नागपूरचे अध्यक्ष किसन गावंडे, दीपक गिऱ्हे आदींची उपस्थिती होती.

यावेळी सभापती संगीता गिऱ्हे यांचा महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, आमदार मिलिंद माने, स्थायी समितीचे सभापती विरेंद्र कुकरेजा व अन्य मान्यवरांनी सभापतीपदी नियुक्तीबद्दल सत्कार केला.

सत्काराला उत्तर देताना सभापती संगीता गिऱ्हे म्हणाल्या, सभापतीपदाने माझी जबाबदारी अधिक वाढविली आहे. आता प्रभागासोबतच झोनअंतर्गत येणाऱ्या सर्व प्रभागांना समान न्याय द्यायचा आहे. विकासकार्यासाठी सर्व प्रभागांना निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करू. सर्वपक्षीय नगरसेवकांच्या माध्यमातून येणाऱ्या जनतेच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार सुधाकर देशमुख, आ.डॉ. मिलिंद माने यांनीही आपल्या भाषणातून सभापती संगीता गिऱ्हे यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांनी पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. स्थायी समितीचे सभापती विरेंद्र कुकरेजा म्हणाले, मंगळवारी झोनच्या विकासासाठी श्रीमती संगीता गिऱ्हे यांना निधी कमी पडू देणार नाही. या झोनच्या विकासासाठी त्यांच्यासोबत आपण उभे राहू, असे ते म्हणाले.

प्रास्ताविकातून माजी सभापती सुषमा चौधरी यांनी मागील कारकिर्दीचा आढावा घेतला. आपल्या कार्यकाळात अपूर्ण राहिलेली कामे नवनिर्वाचित सभापती पूर्ण करतील, असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे संचालन अनिलकुमार नायक यांनी केले. आभार कनिष्ठ अभियंता केशव सोनवणे यांनी मानले.

सत्कार कार्यक्रमानंतर सभापतींच्या दालनात नवनियुक्त सभापती संगीता गिऱ्हे यांनी माजी सभापती सुषमा चौधरी यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. कार्यक्रमाला कार्यकर्ते, गणमान्य नागरिक आणि मंगळवारी झोनचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.