Published On : Wed, Mar 3rd, 2021

संदीप गवई, दीपक चौधरी, मिनाक्षी तेलगोटे, प्रमोद तभाने यांनी स्वीकारला पदभार

Advertisement

जलप्रदाय, अग्निशमन, विधी व क्रीडा समिती सभापतींचे पदग्रहण

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित जलप्रदाय समिती सभापती संदीप गवई, अग्निशमन समिती सभापती दीपक चौधरी, विधी समिती सभापती ॲड. मिनाक्षी तेलगोटे व क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने यांनी बुधवारी (ता.३) पदभार स्वीकारला.

मनपा मुख्यालयातील संबंधित झोन सभापती कक्षामध्ये औपचारीक पदग्रहण समारंभ पार पडला. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, माजी महापौर नंदा जिचकार, माजी उपमहापौर मनीषा कोठे, दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष उपनेते तथा परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, मावळते अग्निशमन समिती सभापती ॲड. संजय बालपांडे, मावळते विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम, मावळते क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, रवींद्र भोयर, नगरसेवक सर्वश्री प्रकाश भोयर, नागेश सहारे, लहुकुमार बेहते, जितेंद्र घोडेस्वार, भगवान मेंढे, नगरसेविका सोनाली कडू, जयश्री वाडिभस्मे, विशाखा मोहोड यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सर्व नवनिर्वाचित विशेष समिती सभापतींच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, जलप्रदाय समितीचे मावळते सभापती विजय (पिंटू) झलके यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ हा उत्तम राहिला. शहरात पाण्याचा सुरळीत पुरवठा व्हावा, याकरिता त्यांनी पुढाकार घेतला व प्रशासनाकडून तसे कार्य करून घेतले. त्यांच्या कार्यकाळात राहिलेली कामे पूर्ण करण्याची जबाबदारी व आव्हान नव्या सभापतींवर असून संदीप गवई ते पूर्णत्वास नेतील, असा विश्वास व्यक्त केला.

अग्निशमन समिती ही महत्वाची समिती आहे. शहराच्या सुरक्षेची काळजी हा विभाग घेतो. मावळते समिती सभापती ॲड. संजय बालपांडे यांनी कोरोनाच्या काळात निर्जंतुकीकरण ते अन्य सुरक्षेच्या बाबतीत प्राधान्याने काम करण्याकडे विशेष लक्ष दिले. पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधून कार्य करण्याची जबाबदारी नवनिर्वाचित सभापती दीपक चौधरी प्राधान्याने पार पाडतील, असाही विश्वास महापौरांनी व्यक्त केला.

विधी व सामान्य प्रशासन समिती सभापती ही कायदेशीरदृष्ट्या मनपाची महत्वाची समिती आहे. मावळते समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी विविध कायदेशीर बाबींना न्याय देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक विषयांचा सखोल कायदेशीर अभ्यास करून त्यांनी ते विषय मांडले व मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला. नवनिर्वाचित सभापती ॲड.मिनाक्षी तेलगोटे या सुद्धा कायद्याच्या अभ्यासक आहेत. त्यांचा कायद्याचा अभ्यास मनपासाठी पुढे कामी येईल, असे महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले.

क्रीडा समिती शहरातील खेळ विकासासाठी नेहमीच महत्वपूर्ण ठरली. या समितीद्वारे शहरात क्रीडा विषयक सुविधा निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य झाले. प्रमोद चिखले यांच्या कार्यकाळात क्रीडा विकासाचे अनेक प्रस्ताव पुढे आले. मात्र कोरोनाच्या काळात ते प्रलंबित राहिले. कोरोनाच्या काळात एक जनप्रतिनिधी आणि मनपाच्या क्रीडा समितीचा सभापती या नात्याने प्रमोद चिखले यांनी महत्वाचे कार्य केले. प्रमोद चिखले यांच्या कार्यकाळात प्रस्तावित असलेले व प्रलंबित राहिलेले महत्वाचे कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी नवनिर्वाचित क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने यांच्यावर आहे. प्रमोद तभाने यांनी यापूर्वी क्रीडा समितीचे उपसभापती म्हणून कार्य सांभाळले असल्याने त्यांच्या मागील अनुभवाचा फायदा समितीला होईल, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.

जलप्रदाय समितीचे मावळते सभापती विजय (पिंटू) झलके यांनी नवनिर्वाचित सभापती संदीप गवई यांच्याकडे पदभार सोपविला. तर मावळते उपसभापती भगवान मेंढे यांनी सरला नायक यांच्याकडे उपसभापती पदाची सुत्रे सोपविली. विजय (पिंटू) झलके यांनी त्यांच्या तीन वर्षातील कार्याचा लेखाजोखा सादर केला. ते म्हणाले, पाणी हा प्रत्येकासाठी जिव्‍हाळ्याचा विषय आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडलेली २४x७ ही संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. अनेक ठिकाणची कार्य पूर्ण झाली. अनेक योजनांचे लोकार्पण करून ते सुरळीत ठेवण्याची जबाबदारी नवीन सभापतींवर आहे. शहरातील पहिली डबलडेकर टाकीचे लोकार्पण लवकरात लवकर करून त्याचा जनतेला लाभ व्हावा यासाठी कार्यवाही करण्याची अपेक्षा त्यांनी संदीप गवई यांचेकडून व्यक्त केले. संदीप गवई यांनी पक्षश्रेष्ठींनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रामाणिक प्रयत्न करण्याचा विश्वास व्यक्त केला.

याशिवाय मावळते अग्निशमन समिती सभापती ॲड. संजय बालपांडे यांनी नवनिर्वाचित सभापती दीपक चौधरी यांच्याकडे पदभार सोपविला. ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी नवनिर्वाचित विधी व सामान्य प्रशासन समिती सभापती ॲड. मिनाक्षी तेलगोटे यांना सभापती व वनिता दांडेकर यांच्याकडे उपसभापती म्हणून पदभार सोपविले. मावळते क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले यांनी नवनिर्वाचित प्रमोद तभाने यांना सभापती म्हणून तर मावळत्या उपसभापती मनीषा कोठे यांनी लखन येरवार यांना उपसभापती म्हणून जबाबदारी सोपविली.