सिंधुदुर्ग:जम्मू-काश्मीरमधील पहलगाम घाटीमध्ये पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांनी केंद्राला काही महत्त्वाच्या बाबींवर सूचित केले आहे. त्यांनी सांगितले की, देशावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेले कठोर निर्णय आवश्यक होते. मात्र, त्याचा विपरीत परिणाम भारतावरच होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना आंबोली-नांगरतास येथील वसंतदादा पाटील ऊस संशोधन केंद्राच्या भेटीदरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध करत, धर्म विचारून हत्या करणे हे अत्यंत गंभीर असून, अशा प्रकारांमुळे देशात तणाव निर्माण होतो, असे मत व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात काही निर्बंध लावले आहेत, हे योग्यच आहे. मात्र, उदा. भारताची विमानसेवा जर पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून थांबवण्यात आली, तर त्याचा फटका आपल्या देशालाच बसेल. त्यामुळे धोरणे आखताना दीर्घकालीन परिणामांचा सुद्धा विचार होणे गरजेचे आहे.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुप्रिया सुळे यांनी प्रतिनिधित्व केले होते. शरद पवार म्हणाले, आपण सगळे देशाच्या सुरक्षेबाबत एकत्र आहोत. अशा वेळी राजकारण न करता सर्वपक्षांनी एकवटले पाहिजे. सरकारला योग्य निर्णय घेण्यासाठी पाठिंबा देणे हेच आपले कर्तव्य आहे.