नागपूर : गर्मीच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने एक विशेष निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), मुंबई येथून नागपूरकडे जाणारी एक वन-वे स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहे.
ही विशेष गाडी (गाडी क्रमांक 01017) 26 आणि 27 एप्रिलच्या मध्यरात्री 12:20 वाजता सीएसएमटीहून रवाना होईल आणि त्याच दिवशी दुपारी 3:30 वाजता नागपूरमध्ये पोहोचेल. या प्रवासात ही ट्रेन दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, माळखेड, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबेल.
या विशेष गाडीत एकूण 21 डबे असतील. यामध्ये 2 एसएलआरडी डबे, 6 सामान्य श्रेणीचे डबे, 10 स्लीपर श्रेणीचे डबे, 2 एसी थ्री-टियर डबे आणि 1 एसी टू-टियर डबा यांचा समावेश आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, त्यांनी वेळेत तिकीट आरक्षित करून या सुविधेचा लाभ घ्यावा. अतिरिक्त गाड्यांच्या व्यवस्थेमुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यास आणि प्रवाशांना प्रवास अधिक सोयीचा होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.