Published On : Sat, Sep 8th, 2018

सनातन व संघाचे मधूर संबंध, मोहन भागवतांनी खुलासा करावा: विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil

पुणे: सनातनसारखी कट्टरवादी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आपले मधूर संबंध असल्याचे सांगते. कदाचित त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई करायला राज्य सरकार तयार नाही, असा आरोप करून सरसंघचालक मोहन भागवत यांनीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सनातनशी नेमके काय संबंध आहेत; ते जाहीर करण्याचे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.

काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्याच्या समारोपीय सभेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, सनातनचे डॉ. जयंत आठवले यांनी अनेकदा लोकांना नक्षलवादी, दहशतवादी बनण्याचे आवाहन केले आहे. राजकीय नेत्यांना ठार मारण्याची आणि राजकीय व्यवस्था उलथवून लावण्याची भाषा वापरली आहे. यासंदर्भातील त्यांची चिथावणीखोर विधाने त्यांचेच मुखपत्र सनातन प्रभातमधून प्रसिद्ध झाली आहेत. हा एक ठोस पुरावा असून, पुरोगामी विचारवंतांप्रमाणेच या पुराव्यांच्या आधारे पोलीस डॉ. जयंत आठवले यांना अटक करणार का? असा खडा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला..

महापुरूषांच्या तसबिरी लावणेही गुन्हा…
भाजप-शिवसेना सरकारच्या काळात परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, घरात पुरोगामी महापुरूषांच्या तसबिरी लावणेही गुन्हा झाल्याचा हल्लाबोल विखे पाटील यांनी केला. साहित्यिक डॉ. वरावरा राव यांच्या मुलीच्या घरी फुले-आंबेडकरांच्या तसबिरी लागलेल्या होत्या. त्यांच्याकडे धाड घालणाऱ्या पुणे पोलिसांनी त्या मुलींना तुम्ही फुले-आंबेडकरांच्या तसबिरी का लावता?असा प्रश्न विचारला. लोकांनी फुले-शाहू-आंबेडकरांच्या नाही, तर संभाजी भिडे अन् डॉ. जयंत आठवलेंच्या तसबिरी लावायच्या का? अशी विचारणाही त्यांनी केली.


मुख्यमंत्र्यांचा कारभार पेशवाईतील नाना फडणविसांसारखाच!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभार पेशवाईतील नाना फडणविसांसारखाच असल्याची मार्मिक टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केली. ते म्हणाले की, आधुनिक फडणवीस सुद्धा पेशवाईतील फडणविसांसारखेच पडद्यामागून सारी सूत्रे हलवतात. पण त्याचा सूत्रधार नेमका कोण, हे शेवटपर्यंत कळत नाही.

साहित्यिक व विचारवंतांच्या अटकेच्या समर्थनार्थ राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व पुणे पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदा घेतल्या. या प्रकारावरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारची आणि पोलिसांची कानउघाडणी केली. तरीही या पत्रकार परिषदांबाबत मुख्यमंत्री मौन धारण करून बसले आहेत. त्यांचे हे मौनच ते या पत्रकार परिषदांचे मूळ आयोजक असल्याचे स्पष्ट करते, असा ठपकाही त्यांनी ठेवला.

शिवसेनेचा सत्ता सोडण्याच्या इशाऱ्यांचा विक्रम हुकला!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सत्तेतून बाहेर पडणार नसल्याच्या विधानाचाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी खरपूस समाचार घेतला. त्यांच्यावर बोचरी टीका करताना ते म्हणाले की, शिवसेनेने आजवर २३५ वेळा सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. लवकरच ते २५० वा इशारा देऊन नवा विक्रम करतील, अशी अपेक्षा होती. परंतु, त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी सत्तेत बाहेर पडण्याची घोषणा करून शिवसेनेची विक्रमी संधी हुकवली, याचे दुःख असल्याचा टोला त्यांनी लगावला.