Published On : Mon, Jan 17th, 2022

कॉटन मार्केट परिसरातील मेट्रो पिलर वर साकारला पोळ्याचा देखावा

Advertisement

अनोखी कलाकृती थ्यारते आहे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र

नागपुरात मेट्रो प्रकल्प राबवताना, महा मेट्रोने विविध अनोखे प्रयोग केले आहे. मेट्रो स्टेशनचे आधुनिक डिझाईन पासून तर व्हर्टिकल गार्डनची संकल्पना राबवली आहे. मेट्रो स्टेशनवर वैविध्यपूर्ण कलाकृती तर साकारली आहेच पण पिलरवर देखील विशिष्ट आणि मनमोहक दृश्ये रेखाटली आहेत. छत्रपती नगर मेट्रो स्टेशन जवळील पिलर वर `चले बढे साथ साथ’ आणि सुभाष नगर मेट्रो स्टेशन जवळील पिलर वर फ्लेमिंगो पक्षांच्या कळप साकारला आहे. याच संकल्पनेत महा मेट्रोने कॉटन मार्केट मेट्रो स्टेशन जवळील एका पिलर वर पोळ्याचे दृश्य साकारले आहे.

हा सण मोठ्या प्रमाणात सर्वत्र आणि विशेषतः ग्रामीण साजरा होत असला तरीही शेतकरी बांधवांकरता तर या सणाचे माहित अनन्य साधारण आहे. शहराच्या कॉटन मार्केट परिसरात पोळा साजरा करण्याचा जुना इतिहास आहे. या भागात मोठा आणि तान्हा पोळा साजरा होतो. काळाच्या ओघात हे सण साजरे होणायचे प्रमाण जरी कमी झाले असले तरीही या भागाची हि ओळख मात्र आजही कायम आहे. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांनी कॉटन मार्केट परिसरातील पिलर वर या सणाचे दृश्य साकारायचा निर्णय घेतला. त्या प्रमाणे मोठा पोळा आणि लहानग्यांकरिता साजरा होणारा तान्हा पोळा – या दोन्हीही उत्सवांचे दृश्य साकारायचे ठरले.


ठरल्याप्रमाणे शहरातील ललित कला क्षेत्रातील तज्ज्ञ श्री विनोद इंदूरकर यांनी लोखंड आणि इतर तत्सम साहित्याच्या माध्यमाने तीन महिन्याच्या परिश्रमानंतर हे दृश्य साकारले. महत्वाचे म्हणजे पिलर च्या चारी बाजूला याच विषयाला अनुसरून चार विविध दृश्ये साकारली आहे. या पैकी एका बाजूला लहान मुलांच्या तान्हा पोळ्याचे दृश्य साकारले आहे. एकूण २४ फूट * ९ फूट अशी याची प्रत्येक बाजूच्या दृश्याची लांबी-रुंदी आहे. ठराविक साहित्याच्या माध्यमाने याची निर्मिती झाल्याने या कलाकृतीवर येते अनेक वर्ष वातावरणाचा कुठलाच परिणाम होणार नाही.

आधी उल्लेख केल्याप्रमाणे छत्रपती नगर आणि सुभाष नगर मेट्रो स्थानकांच्या नजीक देखील देखावे साकार केले आहेत. महा मेट्रो नागपूरच्या झाशी राणी मेट्रो स्टेशन येथे राणीचे म्युरल साकारले आहे. शहराचा इतिहास आणि या भागातील परंपरा विविध मार्गाने साकारण्याचा प्रयत्न महा मेट्रोने केला आहे.