Published On : Mon, Jan 17th, 2022

मनपातर्फे नागपूर शहराच्या इतिहासावर ‘गीत लेखन’ स्पर्धा

Advertisement

२३ जानेवारी सहभागी होण्याची अंतिम तारीख

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे नागपूर शहरावर आधारित ‘गीत लेखन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपण स्वतः लिहलेले गीत ११ ते २३ जानेवारी २०२२ पर्यंत नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या कार्यालयात जमा करावे. इच्छुक स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.

नागपूर शहराला सुमारे सतराशे शतकाच्या कालखंडात ‘नारंगपूर’ या नावाने ओळखल्या जात होते कालांतराने शहराची नागपूर म्हणून विशेष ओळख निर्माण झाली. नागपूर शहराचा स्वतंत्र इतिहास, स्वतंत्र अस्मिता, गौरवशाली परंपरा आहे. देशाच्या मध्यभागी असलेलं नागपूर ऐतिहासिक शहर असून एकेकाळी मध्यप्रदेशची राजधानी म्हणून नागपूर शहराला गौरव प्राप्त आहे. त्यामुळे गीत लेखन करताना नागपूर शहराचे लौकिक सांगणारं…, साता समुद्रापार नागपूरचा इतिहास घेऊन जाणारं…, नागपूरचा अभिमान वाटणारं…, आपलंसं करणारं नागपूर…, स्फूर्ती देणारं नागपूर… अशा प्रकारच्या स्वतंत्र शीर्षक घेऊन गीत लेखन करावे.

कला आणि संस्कृतीचे माहेरघर आसलेल्या या शहराचे या स्पर्धेच्या माध्यमातून एक स्वतंत्र गीत निर्माण होईल, असा विश्वास मनपातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे ही स्पर्धा नसून एक मोहीम आहे. नागपूर शहराबद्दल अभिमान बाळगणाऱ्या जास्तीत जास्त इच्छुक स्पर्धकांनी, कवींनी, गीतकारांनी या गीत लेखन स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन महापौर तर्फे करण्यात आले आहे.

स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रु. ३१ हजार, द्वितीय पारितोषिक रु. २१ हजार आणि तृतीय पारितोषिक रु. ११ हजार तर उत्तेजनार्थ दोन विजेत्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये रोख राशी देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहितीसाठी सचिन ७९७२४००६३१, प्रतीक ७०६६५८१९९८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

स्पर्धेची नियमावली

१. गीत मराठी भाषेत असावे.

२. गीत लेखनाचा विषय हा नागपूर शहराचा इतिहास…. परंपरा… वैभव आणि ओळख सांगणारा असावा.

३. गीताचे लेखन किमान दोन मिनिटे तर जास्तीत जास्त ५ मिनिटात शब्दबद्ध होईल एवढ्याच शब्दात असावे.
४. विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार राशी व विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात येणार आहे.
५. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयाचे कुठलेही बंधन नाही. शाळा/व्यक्तीगत/संस्था सहभागी होऊ शकतील.
६. स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ असे २ पुरस्कार असणार आहेत.
७. सहभागी स्पर्धकांनी लिहलेल्या विजेत्या गीतांवर केवळ आणि केवळ नागपूर महानगरपालिकेचा सर्वतोपरी अधिकार असणार आहे.

८. गीताचे लेखन फिल्मी गीताच्या चालीवर नसावे.

९. विजेत्या गीतांचा पुरेपूर आणि यथोचित विनियोग करण्याचा अधिकार व हक्क नागपूर महानगरपालिकेला असणार आहे.

१०. निवड झालेल्या किंबहुना विजेत्या ठरलेल्या स्पर्धकास पुरस्कार राशी व्यतिरिक्त अन्य कुठलेही मानधन दिले जाणार नाही.

११. स्पर्धेत सहभागी होताना नागपूर महानगरपालिका गीत लेखन करणाऱ्या गीतकारांशी करार केल्या जाईल.
१२. नागपूर महानगरपालिका आपल्या सोयीने बक्षीस वितरण करेल.

१३. स्पर्धेत सहभाग घेताना स्वतःचे ओळखपत्र संलग्नित करावे.

१४. गीत लेखन स्पर्धा ११ ते २३ जानेवारी २०२२ या कालावधीत असणार आहे. उपरोक्त कालावधीत स्पर्धकांनी आपले गीत पेनड्राइव्हमध्ये कंपोझिशन करून क्रीडा विभागात आणून द्यावे.

१५. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश शुल्क मात्र १०० रुपये.