Published On : Tue, Apr 28th, 2020

रामटेकच्या शोभयात्रेचे आधारवड संत गोपालबाबा ब्रह्मलीन

“आदमी बुरा नही होता ,उसका समय बुरा होता है”:-गोपालबाबा भजनातील सूर उतरले प्रत्यक्षात। रामटेक(शहर प्रतिनिधी)रामटेक नगरीच्या सामाजिक ,सांस्कृतिक आध्यात्मिक जीवनातील आधारवड रामटेकच्या वैकुंठ चतूदशी शोभयात्रेचे जनक ,महर्षी अगस्ती मुनी आश्रमाचे संत गोपालबाबा आज सकाळी साडेदहाला ब्रम्हलीन झाले.रामटेक नगरीच्या आध्यात्मिक, सामाजिक ,सांस्कृतिक जीवनाला आकार देणार , पांढऱ्याशुभ्र रंगाची पांढरी लुंगी आणि बंडी या वेशभूषेत गोरगरिब,सामान्यांच्या घरापासून तर श्रीमंतांच्या महालमाडीपर्यंत सर्वत्र संचार करणारे व्यक्तिमत्त्व. दरवर्षी रामटेक येथे शोभायात्रा,तीर्थक्षेत्र अंबाळा येथे गंगादशहरा,गडमंदिरावर बन्सीदास महाराज पुण्यतिथी महोत्सव गोपालबाबा आणि त्यांच्या निवडक कार्यकर्त्यांसह प्रचंड कष्ट घेऊन श्रद्धा आणि आस्थेने साजरे करायचे.अनेक धार्मिक कार्यक्रमात अग्रस्थानी असतांना दिवाळीच्या दिवसात काकड आरती संपली की कर्णमधुर आणि सात्विक गोड गल्याने रामायण गायचे.पूर्ण रामटेक नगरी भल्या सकाळी रामायण घरबसल्या ऐकायची .

“आदमी बुरा नही होता,उसका समय बुरा होता है”यासह रामायनातली पद ऐकून रामटेककर आणि दिवाळीत येणारी पाहुणे मंडळी भावविभोर होऊन जायची.रामायण झाल की गोपालबाबा शोभयात्रेच्या देणगीसाठी गावोगाव फिरायचे.रात्री उशिरा अगस्ती आश्रमात आल्यावर पहाटे चार पासून पूजा अर्चा आणि रामायण पाठात मग्न असायचे.पायाला भिंगरी लावून खेडोपाडी व रामटेक मधील घराघरातून शोभायात्रेसाठी देणगी गोळा करायचे. रुपयापासून तर हजारापर्यंतची देणगी गोळा करताना ते प्रत्येकाच्या घराचे दार ठोठावायचे.यावेळी भेटेल त्या प्रत्येक माणसाचा कौशल्यपूर्ण उपयोग करून घेण्यात त्यांचा हातखंडा होता.प्रत्येकाकडून तन मन धनाने सहकार्य झालेच पाहिजे यासाठी त्यांचा आग्रह असे.

शोभयात्रेच्या दिवशी अठरा भुजा गणेश मंदिर ते रामतलाई धार्मिक मैदान आणि नंतर नेहरू मैदान या शोभायात्रेच्या प्रवासात सारे कौशल्य पणाला लावून भारतीय प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा, रामायण,महाभारत, विष्णुपुराण,शिवलीलामृत मनोवेधक प्रसंग यातील जिवंत पात्रांचे देखावे गर्दीला तृप्त तृप्त करून टाकायचे.यातही दरवर्षी झाक्यांना बक्षिसांची रक्कम वाढविताना रामायण महाभारतातील कलावंत आणि सिनेसृष्टीतील कलावंतांना रामनगरीत आदर सन्मानाने बोलाऊन शोभायात्रेला एका लक्षणीय उंचीवर नेऊन ठेवले.अरुण गोविलापासून तर दारासिंगापर्यंत अनेकांचे दर्शन शोभायात्रेतून घडविले.


यादरम्यान अनेक वाईट चुकीच्या गोष्टी घडत असतानाही आणि कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असतानाही फक्त शोभयात्रा भव्यदिव्य व्हावी यावर त्यांचा भर असे.गंगादशहरा अंबाळ्यात साजरा करताना त्याला काही काळासाठी शरयूकाठाच सौंदर्य व रूप प्राप्त व्हायचं.गुरू बन्सीदास महाराजांच्या पुण्यतिथीत शुद्ध सात्विक अनुभूती आणि भजन पूजन महाप्रसादाचा संगम घडून यायचा.

पियुष महाराजांचे व श्री अरविंद महाराजांचे श्रीमद भागवत आणि अन्य धार्मिक कार्यक्रम रामटेक नगरीने अनुभवले.समाजातील प्रत्येक वर्गाला सोबत घेऊन काम करण्याचं कसब हे त्यांचं सर्वात महत्त्वाच वैशिष्ट्य. गेल्या दोन वर्षांपासून शारीरिक व्याधींनी त्रस्त संत गोपालबाबा आज ब्रम्हलीन झाले.पवित्र तीर्थक्षेत्र अंबाला येथे शिष्यपरिवार,विविध क्षेत्रातील निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले.