Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Apr 28th, 2020

  नागपूर ग्रामीण मधील १५ हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत

  नागपूर: सोमवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसामुळे खंडित झालेला वीज पुरवठा महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दिवसभरात सुरळीत केला. पारशिवनी तालुक्यातील फिरंगा तर्रा या गावातील ३५ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवार दिनांक २८ एप्रिल रोजी नदीतून वीज वाहिनी नेऊन वीज पुरवठा सुरळीत केला.

  सोमवारी रात्री आलेल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसामुळे या गावाला वीज पुरवठा करणारी वीज वाहिनी तुटून पडली. संध्याकाळची वेळ असल्याने येथे वीज पुरवठा करणे अशक्य होते. वीज वाहिनी पेंच तुटून नदीत पडली होती. सावनेर विभागाचे कार्यकारी अभियंता कुलदीप भस्मे यांनी तात्काळ नवीन वीज वाहिनी उपलध्द करून दिली. वीज वाहिनी वाहून नेण्यासाठी नेण्यासाठी होडीची व्यवस्था केल्यावर आज सकाळी वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु झाले. दुपारच्या सुमारास येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले.

  महावितरणच्या पारशिवनी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता मनोज मानमोडे यांच्यासह पारशिवनी शाखा कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता निखिल गायकवाड यांनी या कामी मेहनत घेतली. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र असताना वीज ग्राहकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी महावितरणचे अधिकारी-कर्मचारी सतत झटत आहेत. वीज पुरवठा सुरळीत करतेवेळी महावितरण कर्मचाऱ्यांनी आवश्यक सुरक्षित संसाधनांचा वापर केला होता.

  पारशिवनी तालुक्यातील तामसवाडी गावाला वीज पुरवठा करणी वीज वाहिनी आज पहाटे ६ वाजताच्या सुमारास तुटल्याने सुमारे ३०० वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. सोबतच काही ठिकाणी विजेचं खांब झुकले होते. महावितरणच्या जनमित्रांनी तात्काळ हालचाल करीत येथील वीज पुरवठा दुपारी पूर्ववत केला. गोंड खैरी येथील नीमजी गावात आज पहाटेच्या सुमारास १० लघु दाब वीज खांब कोसळल्याने १५० वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यास महावितरणला यश आले. गोंडखैरी येथील शाखा अभियंता तुळशीराम लांजेवार यांनी येथे मेहनत घेतली.

  रामटेक उपविभागाला सोमवारी आलेल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसाचा मोठा फटका बसला. पवनी येथे ३३ कि. व्हो. वीज वाहिनीचा खांब पडल्याने सुमारे १०० गावातील १२ हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वीज खांब तुटल्यावर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मध्यरात्री दिड वाजताच्या सुमारास येथील वीज पुरवठा सुरळीत झाला. मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या देवलापार आणि पवनी शाखा कार्यालय हद्दीत येणाऱ्या काही गावातील वीज वाहिनी जंगलातून जात असताना देखील महावितरणच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुरळीत केला. अशी माहिती मौदा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित परांजपे यांनी दिली.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145