नागपूर -नागपूर शहरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या बनावट शिक्षक नियुक्ती व शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. या अटकेमुळे या प्रकरणातील एकूण अटकांची संख्या २० वर पोहोचली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दिलेशकुमार छबीलाल कटरे (वय ४४), रूपाली बिहारीलाल रहांगडाले (वय ४०) आणि भाऊराव मधुकर मालथे (वय ५६) यांचा समावेश आहे. हे तिघे गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील एका शैक्षणिक संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत असल्याचे दाखवून शासकीय लाभ घेत असल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिस तपासानुसार, आरोपींनी बनावट अनुभव प्रमाणपत्रे व खोट्या कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी मिळवून शासनाची फसवणूक केली. हा प्रकार २०१७ ते २०२३ या कालावधीत घडल्याचे निष्पन्न झाले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५४/२०२५ अन्वये बी एनएस. कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ४७२, ४०९, १२०(ब) व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. तसेच प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.









