Published On : Fri, Oct 7th, 2022

साहित्‍य संमेलन लोगोचे नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते अनावरण

Advertisement

नागपूर: अखिल भारतीय मराठी साहित्‍य महामंडळाच्‍या येत्‍या फेब्रुवारी महिन्‍यात वर्धा येथे होणा-या 96 व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या लोगोचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते मंगळवारी अनावरण करण्‍यात आले.

यावेळी विदर्भ साहित्‍य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, विलास मानेकर, डॉ. रवींद्र शोभणे, विवेक अलोणी, प्रदीप दाते, प्रदीप मोहिते, मंजुषा जोशी, तसेच, वर्धा शाखेचे संजय इंगळे तिगावकर, डॉ. राजेंद्र मुंढे, रंजना दाते, महेश मोकलकर, आकाश दाते यांची यावेळी उपस्‍थ‍िती होती.

विदर्भ साहित्‍य संघाच्‍या शतकोत्‍सवाच्‍या पार्श्‍वभूमीवर हे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन साहित्‍य वर्धा येथे आयोजित केले जात आहे. वर्धा येथील स्‍वावलंबी विद्यालयाच्‍या विस्‍तीर्ण मैदानात होणारे हे संमेलनात गांधीविनोबांच्या विचारांनी प्रेरित असावे, त्‍यात तरुणाईचा सहभाग अधिकाधिक असावा आणि ते कायम स्‍मरणात राहिल असे व्‍हावे, असे मत मनोहर म्‍हैसाळकर यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.

वर्धा शहराचे स्‍वातंत्र्यलढ्यातील योगदान मोठे असून राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांनी आयुष्‍याची शेवटी बारा वर्षे वर्धेजवळील सेवाग्राम आश्रमात व्‍यतीत केली होती. ही ऐतिहासिक पार्श्‍वभूमी लक्षात घेऊन प्रसिद्ध चित्रकार प्रमोद कळमकर यांनी वर्धा जिल्‍ह्याचा नकाशा, चरखा आणि लेखणीचा यांचा कलात्‍मक वापर करून हा लोगो तयार केलेला आहे. नितीन गडकरी यांनी लोगोच्‍या कलात्‍मकतेचे कौतूक करतानाचा संमेलनाचे आयोजन भव्‍य होण्‍याकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्‍याचे यावेळी आश्‍वासन दिले.