Published On : Fri, Jan 10th, 2020

सदर उड्डाणपूलाचे गडकरींच्या हस्ते लोकर्पण

Advertisement

नागपूर शहरात पायाभूत सुविधा तसेच सांस्कृतिक, शैक्षणिक सुविधांद्वारे नागपूरचा सर्वांगीण विकास साधल्या जात आहे . असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक महामार्ग मंत्री आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नितिन गडकरी यांनी आज केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत लिबर्टी चौक ते मानकापूर पर्यंत असणाऱ्या सदर उड्डाणपुलाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , महापौर संदीप जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.

लिबर्टी चौक ते मानकापूर व नागपूर-काटोल रोडवरील छावणी चौकापर्यंत तयार करण्यात आलेल्या या उड्डाणपुलाचे लांबी एकूण 3. 98 किलोमीटर असून या उड्डाणपुलाचे काम 285 कोटी रुपयांचा तरतुदीने करण्यात आले आहे. उड्डाणपुलामुळे सदर बाजार येथील वाहतूक सुरळीत होईल.

नागपूर शहरांमध्ये एम्स, आयआयएम ,ट्रिपल आयटी, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीत तसेच सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी यांच्या स्थापनेमुळे शैक्षणिक विकास होत आहे. शैक्षणिक विकासासोबतच सुरेश भट सभागृह, खासदार क्रीडा महोत्सव खासदार सांस्कृतिक महोत्सव यांच्या माध्यमातून सांस्कृतिक विकास साधला जात आहे. नागपुरात 350 क्रीडांगणे बांधण्यात येणार असून खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन सुद्धा 12 जानेवारीला सनी देओल यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. खासदार सांस्कृतिक महोत्सवाची यशस्वी वाटचाल बघून येत्या काळात सहा विधानसभा क्षेत्रातही असे सहा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहेत ,असे त्यांनी सांगितले.

नागपूर शहरातील मेट्रोच्या कार्याची प्रशंसा जर्मनी व फ्रान्स येथील पथकाने केली आहे. मेट्रोचा पहिला टप्पा नऊ हजार कोटी रुपयांच्या तरतुदीने येत्या 6 महिन्यात पूर्ण होईल तसेच दुसरा टप्पा 9 हजार कोटी रुपयाच्या तरतुदीने आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने संपूर्ण नागपूर शहरांमध्ये 70 ते 75 हजार कोटींची कामे पूर्ण झाली असून येत्या पाच वर्षात राहिलेली कामे सुद्धा आपण पूर्ण करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अधिकारी अभिजीत जिचकार, सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.