Published On : Fri, Feb 14th, 2020

शहराचे विद्रुपीकरण थांबविण्यासाठी तयार होतेय केबल ऑपरेटर्ससाठी नियमावली : उपमहापौर मनीषा कोठे

नागपूर: कुठलीही परवानगी न घेता केबल ऑपरेटर्सर्फे टाकण्यात येणाऱ्या केबल्समुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. या बाबीची गंभीर दखल घेत आता नागपूर महानगरपालिकेने कायद्याचा आधार घेत यासाठी कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नियमावली तयार करण्यात येत असून त्याला लवकरच अंतिम स्वरूप देण्यात येईल, अशी माहिती उपमहापौर मनीषा कोठे यांनी दिली.

यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी उपमहापौर मनीषा कोठे यांच्या नेतृत्वात समितीचे गठन करण्यात आले आहे. त्यांच्या अध्यक्षतेत शुक्रवारी (ता. १४) उपमहापौर कार्यालयात समितीची बैठक पार पडली. बैठकीला उपमहापौर मनीषा कोठे यांच्यासह स्थापत्य व प्रकल्प समितीचे सभापती अभय गोटेकर, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एस. मानकर, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, नगर रचना विभागाचे श्रीकांत देशपांडे, श्री. गभने उपस्थित होते.

बैठकीत शहरात वाढलेल्या ‘ओव्हरहेड केबल’चे प्रमाण, त्यामुळे शहराचे होत असलेले विद्रुपीकरण आणि हे विद्रुपीकरण रोखण्यासाठी जी नियमावली तयार करण्यात येत आहे, त्याबाबत चर्चा करण्यात आली. यासंदर्भात नुकतीच केबल ऑपरेटर्सची बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत ठरल्यानुसार यासंदर्भात केबल ऑपरेटर्सच्या काही सूचना असतील तर त्यांनी त्या समितीकडे नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत कोणतीही सूचना आली नाही. त्यामुळे यासंदर्भात समितीतर्फे केबल ऑपरेटर्सना पुन्हा आवाहन बैठकीच्या माध्यमातून करण्यात आले. ज्यांना यासंदर्भात सूचना नोंदवायच्या असतील, त्यांनी तातडीने त्या नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले.

‘सिस्टेमॅटिक केबल सिस्टीम’ शहरात अंमलात आणण्यासाठी आणि शहराचे विद्रुपीकरण थांबविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने हे सकारात्मक पाऊल लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. यासाठी केबल ऑपरेटर्सने सहकार्य करावे, असे आवाहनही उपमहापौर मनीषा कोठे यांनी केले.