Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Dec 11th, 2018

  लसीकरणाबाबत पालकांच्या मनातील भीती घालवा

  गोवर रूबेला लसीकरण मोहीम : उर्दू शाळांमध्ये जनजागृती वाढविण्यावर चर्चा

  नागपूर: शहरात अनेक भागात गोवर-रूबेला लसीकरणासंदर्भात अनेक गैरसमज पसरविण्यात येत आहेत. त्यामुळे पालकांच्या मनात भीती आहे. परिणामी लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यात अडथळे निर्माण होत आहेत. ९ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांना गोवर-रूबेला लसीकरणाबाबत पालकांच्या मनातील भीती घालवून मुलांच्या आरोग्यासाठी लसीकरण का आवश्यक आहे, हे पटवून देण्यात यावे. यासाठी सर्वत्र जनजागृती होणे महत्त्वाचे आहे, असा सूर मंगळवारी (ता.११) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या बैठकीत निघाला.

  गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेतील अडचणींसंदर्भात मंगळवारी (ता.११) आयोजित बैठकीमध्ये बसपा गटनेता मोहम्मद जमाल, सतरंजीपुरा झोन सभापती यशश्री नंदनवार, नगरसेवक संजय चावरे, नगरसेविका मनिषा अतकरे, अभिरूची राजगिरे, मनपा आरोग्य अधिकारी भावना सोनकुसरे, डब्लूएचओचे प्रतिनिधी डॉ.मोहम्मद साजिद, डॉ.एस. श्रीधर, लसीकरण अधिकारी डॉ. सुनील घुरडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, डॉ.नरेंद्र बहिरवार, आरोग्य समन्वयक सोनाली नागरे आदी उपस्थित होते.

  शहरातील अनेक उर्दू शाळांमधील पालक लसीकरणाला भीतीपोटी विरोध करीत आहेत. त्यामुळे संपूर्ण लसीकरणाचे उद्दीष्ट्य पूर्ण करून गोवर रूबेलाचे संपूर्ण उच्चाटन करण्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. स्वत:च्या स्वार्थासाठी समाजाची दिशाभूल करून मुलांचे भविष्य खराब करण्याचे षडयंत्र आहे. त्यामुळे अशा भागांमध्ये जनजागृती करणारे व लसीकरणाचे महत्व लक्षात आणून देणारे व्‍हीडिओ दाखविण्यात यावे, असे मत बसपा गटनेता मोहम्मद जमाल यांनी यावेळी व्‍यक्त केले.

  शहरातील उच्च शिक्षण देणाऱ्या मोठ्या शाळा व एकदम झोपडपट्टी भागातील शाळांमध्ये लसीकरणाची टक्केवारी कमी आहे. त्यामुळे अशा शाळांमध्ये पुन्हा लसीकरण मोहीम राबवून ज्यांना लसीकरण झाले नाही अशा मुलांना त्यांच्या पालकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देऊन यासाठी राजी करण्यात यावे. याशिवाय जनजागृतीसाठी शहरातील लोकप्रतिनिधी तसेच मोठ्या नेत्यांचे आवाहन करणारे व्‍हीडिओ प्रसारीत करण्यात यावे. गोवर-रूबेलाच्या उच्चाटनासाठी आपल्या प्रभागात येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असल्याचे नगरसेवक संजय चावरे म्हणाले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145