Published On : Tue, Dec 11th, 2018

प्रभागातील नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यास मनपा कटिबद्ध

महापौर आपल्या दारी : लकडगंज मधील झोन समस्या जाणून घेतल्या

नागपूर : प्रभागातील नागरिकांना मुलभूत गरजा मिळणे हा त्यांचा नैतिक अधिकार आहे. नागरिकांना पाणी, रस्ते, स्वच्छता या सर्व मुलभूत सुविधा देण्यास मनपा कटिबद्ध आहे. मी स्वतः त्याचा पाठपुरावा करून नागरिकांना सर्व सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न करीन, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी दिला.

Advertisement

महापौरांनी नागपूर शहरातील नागरिकांच्या झोननिहाय समस्या जाणून घेण्यासाठी महापौर आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत मंगळवारी महापौर नंदा जिचकार यांनी लकडगंज झोनमधील प्रभाग क्रमांक ४ व २३ मधील नागरिकांशी भेट घेऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी लकडगंज झोन सभापती दीपक वाडीभस्मे, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, रा.काँ गट नेते दुनेश्वर पेठे, नगरसेविका निरंजना पाटील, मनिषा अतकरे, मनिषा धावडे, नगरसेवक राजकुमार साहू, शेषराव गोतमारे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त विजय हुमने, सुभाष जयदेव प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी झोनमधील प्रत्येक विभागात जाऊन पाहणी केली. झोन कार्यालयातील समाजकल्याण विभागात अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश सहायक आयुक्तांना दिले. याचवेळी त्यांनी मालमत्ता व पाणी कर वसुलीसंदर्भात संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून आढावा घेतला. करवसुलीचा वेग वाढवा आणि १०० टक्के उद्दिष्ट गाठा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

त्यानंतर त्यांनी कळमना येथील नवनिर्मित जलकुंभ परिसाराला भेट दिली. तेथील नागरिकांशी संवाद साधला. त्याठिकाणी पाण्याचा समस्या मोठ्या प्रमाणावर होत्या. सहा महिन्याच्या आत पाण्याच्या सर्व समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन महापौर नंदा जिचकार यांनी दिले. कचरा गाडी नियमित येत नाही, अशी तक्रार केली असता संबंधित स्वास्थ निरिक्षकाला महापौर नंदा जिचकार यांनी जाब विचारत कचऱ्यासंबंधी समस्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्यात, अन्यथा कडक कारवाई करू, असा इशारा महापौर नंदा जिचकार यांनी दिला.

विजयनगर परिसरात मोकळ्या भूखंडावर पाणी साचून राहते, याबाबत तक्रार होती. गडरलाईन चोकअप झाल्याने ही समस्या उद्‌भवली, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर बोलताना महापौर नंदा जिचकार यांनी उपअभियंते आणि संबंधित अधिकऱ्यांनी यात लक्ष घालून समस्या लवकरात लवकर मार्गी लावावी, असे निर्देश महापौरांनी दिले.

कळमना परिसरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातून कचरा जाळल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत असल्याची तक्रार नगरेसवक राजकुमार साहू यांनी केली. त्यावर बोलताना महापौर नंदा जिचकार यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला याबाबत पत्र देण्यात यावे, यानंतरही समस्या न झाल्यास नोटीस बजावण्यात याव्यात, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

भरतवाडा व पुनापूर येथील दहन घाटाची पाहणी मान्यवरांनी केली. त्या ठिकाणी सौंदर्यीकरण व नूतनीकरण गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी केली. त्यावर बोलताना महापौर नंदा जिचकार यांनी याबाबत प्रस्ताव तयार करावा, असे आदेश दिले.

यानंतर महापौरांनी शास्त्रीनगर ते बाभूळगाव या रस्त्याची पाहणी केली. गरोबा मैदानाच्या परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. सर्व समस्या मी सोडविण्यासाठी पुढाकार घेईल, असे आश्वासन महापौर नंदा जिचकार यांनी दिले. महापौर आपल्या परिसात आल्याने परिसरात आनंदाचे वातावरण होते. ठिकठिकाणी महापौर नंदा जिचकार यांचे पुष्पगुच्छ देऊन नागरिकांनी स्वागत केले.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement