Published On : Sat, Sep 7th, 2019

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना साडेपाच कोटी रुपयांची कामे

नागपूर: महावितरणच्या नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाने ग्रामीण भागातील ६७ विदुयत शाखेतील पदवीधर/पदविकाधारक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना ५ कोटी ५० लाख रुपयांची कामे लॉटरी पद्धतीने वितरित केली.

काटोल रोड येथील कार्यालयात आयोजित या सोडतीसाठी महावितरणकडे जिल्ह्यातील ७८ सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यानी आपली नावे सूचिबद्ध केली आहेत यातील ६७ जणांनी आज उपस्थिती लावली. त्यांना लॉटरी पद्धतीने कामाचे वाटप करण्यात आले. यात २२ नवीन सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना १ कोटी ८१ लाख रुपयांची तर ४५ जुन्या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना ३ कोटी ७२ लाख रुपयांची कामे देण्यात आली.

आज ज्या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामे देण्यात आली यात मुख्त्वे जिल्हा विकास नियोजन विकास समितीच्या कामांचा समावेश असून सोबतच नवीन पथदिव्यांची उभारणी, पाणी पुरवठा योजनेस वीज पुरवठा करणे, नवीन रोहित्रांची उभारणी, नवीन उपरी आणि भूमिगत वाहिन्या टाकणे, लघुदाब वीज वाहिन्या उभारणे या कामांचा समावेश आहे.

राज्य शासनाने राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना लॉटरी पद्धतीने कामे देण्याचा निर्णय सन २०१५ मध्ये घेतला होता. यानुसार महावितरणच्या नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाने आजपोवतो १२ कोटी १५ लाख रुपयांची कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना देण्यात आली

आहेत. सन २०१५-१६ मध्ये ११ सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना २५ लाख रुपयांची केवळ ५ कामे देण्यात आली होती. या नंतर सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचा याकडे ओढा वाढू लागल्याने ग्रामीण मंडल कार्यालयात ७८ सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी लॉटरी पद्धतीने काम करण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. नागपूर शहर मंडल कार्यालयाने दोन दिवसापूर्वी शहरातील ४४ सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना ३ कोटी ७० लाख रुपयांची कामे लॉटरी पद्धतीने दिली. अश्या प्रकारे नागपूर जिल्ह्यात या वर्षी एकूण ९ कोटी पेक्षा अधिक रुपयांची कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना देण्यात आली आहेत.

आजच्या कार्यक्रमास नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, कार्यकारी अभियंता (प्रशासन)राजेंद्र गिरी, उप व्यवस्थापक(वित्त व लेखा)अतुल राऊत, उपकार्यकारी अभियंता चौरागडे यावेळी उपस्थित होते.