Published On : Sat, Sep 7th, 2019

आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते विजयनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण

नागपूर : राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर महानगरपालिका अंतर्गत नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने प्रभाग क्र.४ मधील विजयनगर (भरतवाडा) नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे शनिवारी (ता.७) पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. बजरंग चौक (भरतवाडा) येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, लकडगंज झोन सभापती राजकुमार साहु, नगरसेविका मनिषा अतकरे, माजी नगरसेवक प्रमोद पेंडके, आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ. सरीता कामदार, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. कुबडे, सेतराम सेलोकर, दिनाजी गुरूपंच, प्रेम कुटे, लाला पाण्डेय, जागेश्वर हिरवानी, विशाल सिलोटीया, रघुनाथ वाघमारे, सागर पाल, धन्नु चकोले, नीरज वाघमारे आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे महानगरपालिकेचे कार्य आहे. त्यामुळे सर्वांना उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यासाठी मनपा कटिबद्ध आहे. लकडगंज झोनचे सभापती राजकुमार साहु यांच्या पुढाकाराने विजयनगर (भरतवाडा) येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाले असून यामुळे परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवेचा लाभ घेता येणार आहे, असेही त्या म्हणाल्या. आपले आरोग्य सुदृढ राखणे हे आपल्याच हातात असून त्यासाठी सर्वांनी स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या घरी, परिसरात स्वच्छता राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


विजयनगर (भरतवाडा) येथील नागरिकांच्या सुविधेसाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे यासाठी वेळोवेळी प्रयत्न करुन व त्याचा सातत्याने पाठपुरावा करून ते पूर्ण करून घेतल्याबद्दल पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी लकडगंज झोनचे सभापती राजकुमार साहु यांचे अभिनंदन केले. विजयनगर भागामध्ये आरोग्य केंद्रामुळे नागरिकांसाठी मोठी सुविधा निर्माण झाली आहे. नागरिकांना होणारा त्रास यामुळे कमी होणार आहे. या आरोग्य केंद्रामधून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यात येतील, याकडे विशेष लक्ष देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळणार या सुविधा
विजयनगर (भरतवाडा) नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत सुरू असेल. सर्व वयोगटातील नागरिकांच्या तपासण्या या आरोग्य केंद्रात होतील. बाह्यरुग्ण तपासणी, प्रसुती तपासणी, बालरोग तपासणी, कुटुंब कल्याण समुपदेशन, लसीकरण सेवा, आर.टी.आय. व एस.टी.आय. समुपदेशन, कुष्ठरोग व क्षयरोग तपासणी, हिवताप व हत्तीरोग निदान व उपचार, मैत्री क्लिनिक, रक्तदाब, मधुमेह तपासणी व उपचार, जलजन्य रोग निदान व उपचार, प्रयोगशाळा तपासणी, औषधी, मलमपट्टी आदी सुविधा आरोग्य केंद्रामधून मिळणार आहेत.