गोंदिया – दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळातील रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) विशेष टास्क टीमने रेल्वे स्टेशन गोंदिया येथे मोठी कारवाई करत १०.३६८ किलो वजनाचे चांदीचे दागिने, अंदाजे किंमत ९,७४,५९२ रुपये जप्त केले. सदर प्रकरणात दोन संशयित व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई मंडल सुरक्षा आयुक्त दीप चंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गाडी क्रमांक १५२३१ गोंदिया–बरेली एक्सप्रेसच्या आगमनावेळी संशयास्पद स्थितीत आढळलेल्या नरेश कन्हैयालाल वलैचा (वय ६२) व विष्णु गोपीचंद नागभीरे (वय ५४) दोघेही राहिवासी गोंदिया, यांच्याकडून तपासणीदरम्यान चांदीचे दागिने आढळून आले.
या दोघांनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.दागिने रेल्वेच्या माध्यमातून वाहतूक करण्यासाठी कोणतेही वैध कागदपत्र अथवा व्यवहाराचे अधिकृत तपशील यांच्याकडे नसल्याचे निष्पन्न झाल्यावर आरपीएफने आयकर विभाग, नागपूर यांना माहिती दिली असून पुढील चौकशी व कार्यवाही आयकर विभाग करत आहे.
या कारवाईत निरीक्षक कुलवंत सिंह यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक राहुल पांडेय, धर्मेंद्र कुमार, विशाल ठावरे, दीपक कुमार आणि प्रधान आरक्षक मिथिलेश चौबे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.रेल्वे सुरक्षा दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की, रेल्वेच्या माध्यमातून होणाऱ्या बेकायदेशीर तस्करी, मादक पदार्थांची वाहतूक, रोख रक्कम, सुवर्ण व रौप्य वस्तूंची बेकायदेशीर हालचाल किंवा मानव तस्करीसारख्या गुन्ह्यांची माहिती मिळाल्यास त्वरित RPF किंवा GRP ला कळवावे, जेणेकरून त्वरित कारवाई करता येईल. रेल्वे सुरक्षा दल आपली सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सदैव तत्पर व कटिबद्ध आहे. जनतेने या मोहिमेत सहभागी होऊन समाजहितासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.