नागपूर : सडी सुपारी घोटाळा हा देशाच्या आरोग्य आणि अर्थव्यवस्थेविरोधातील एक ‘धीमा विषप्रयोग’ असल्याचा गंभीर आरोप आंतरराष्ट्रीय ह्युमन राइट्स अॅम्बेसेडर्स ऑर्गनायझेशनचे नागपूर अध्यक्ष मजहरुल्ला खान यांनी केला आहे. त्यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले की, सध्याच्या सुपारी व्यापारामध्ये काही व्यापारी घटक आणि अधिकाऱ्यांनी मिळून जहाल रसायनांनी प्रक्रिया केलेली सुपारी बाजारात पाम सुपारी या नावाने विक्रीस ठेवली आहे.
ही सुपारी डिडॉल व अन्य घातक रसायनांनी रोस्ट करण्यात येते, ज्यामुळे ती आरोग्यास अतिशय अपायकारक ठरते. या सुपारीचे सेवन केल्याने कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांना आमंत्रण मिळते. यामुळे पारंपरिक नैसर्गिक सुपारीचा विश्वास हरवत असून, भारतातील पारंपरिक सुपारी उद्योगही धोक्यात आला आहे, असे खान यांनी म्हटले आहे.
या घोटाळ्यात राजू अण्णा, विजय दिलीप अमेसर, राजू वंशानी, प्रदीप पंजवाणी, भाविक, आरिफ भोपाली, विनोद हेमनानी, आदिनाथ वाधवानी, सोनू भांजा, हिमांशू भद्रा, सोनू मोटवाणी, महेंद्र जैन, अनमोल, विक्की नागदेव आदी व्यापाऱ्यांची नावे समोर आली आहेत.
खास करून विनोद हेमनानी आणि आदिनाथ वाधवानी यांच्यावर बिलाविना माल साठवणूक व १०० कोटीपर्यंतचे कोल्ड स्टोरेज उभारणे यांसारखे गंभीर आरोप असून, त्यांच्याविरुद्ध तातडीने सखोल तपास होण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
या घोटाळ्याची व्याप्ती केवळ व्यापाऱ्यांपुरती मर्यादित नसून, एफडीए, जीएसटी, कस्टम आणि इतर संबंधित शासकीय अधिकारी यांचाही यात सहभाग असल्याचा गंभीर आरोप पत्रकात करण्यात आला आहे. या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची लाच घेऊन या घातक सुपारीस बाजारात परवानगी दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मजहरुल्ला खान यांची मागणी :
पाम रोस्टेड सुपारीवर तातडीने बंदी घालण्यात यावी.
घोटाळ्यातील दोषी व्यापारी व अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी.
सुपारी व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र देखरेख समिती स्थापन करण्यात यावी.
या प्रकरणाची सीबीआयमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.
“जर वेळेत पावले उचलली नाहीत तर ही रासायनिक सुपारी देशातील लाखो लोकांचे आरोग्य उध्वस्त करेल आणि भारताची व्यापारी साख अंतरराष्ट्रीय स्तरावर डागाळेल,” असा इशाराही खान यांनी दिला.