मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळात मोठा बदल करत माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खातं काढून घेण्यात आलं असून, त्यांच्या जागी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांची कृषीमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. कोकाटे यांचा ऑनलाईन गेम खेळतानाचा व्हिडिओ चर्चेत आल्यानंतर त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी गमवावी लागली आहे. त्यांना आता क्रीडा खातं देण्यात आलं आहे.
दत्तात्रय भरणे यांनी नवीन मंत्रीपद स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की, “शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या मला कृषी खात्याची जबाबदारी मिळणं ही अत्यंत गौरवाची बाब आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दाखवलेला विश्वास पेलण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन.”
कर्जमाफीवर भाष्य करताना भरणे म्हणाले…
कर्जमाफीबाबत विचारले असता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “सध्या मी अजून खात्याचा अधिकृत कार्यभार घेतलेला नाही. त्यामुळे कुठलाही निर्णय घेण्याआधी खात्याची संपूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे. कर्जमाफीसारख्या निर्णयांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील.”
शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्या योजना राबवणार-
शेतकऱ्यांसाठी काय करणार या प्रश्नावर दत्तात्रय भरणे म्हणाले, “शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याचा माझा प्रयत्न राहील. नव्या कल्पना, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आणि योजनांची अंमलबजावणी यावर भर दिला जाईल.”
आत्महत्येच्या गंभीर प्रश्नावर नंतर बोलणार-
राज्यातील शेतकरी आत्महत्यांवर भरणे म्हणाले, “हा अत्यंत गंभीर विषय आहे. पदभार स्वीकारल्यानंतर या समस्येचा सखोल अभ्यास करून योग्य त्या उपाययोजना निश्चितपणे राबवण्यात येतील. मी स्वतः शेतकरी असल्यामुळे त्यांच्या वेदना समजतो.”
दत्तात्रय भरणे यांनी सुस्पष्ट आणि संयमित भूमिका मांडत, शेतकऱ्यांच्या हितासाठी झटण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या कार्यकाळाकडं आता सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.