Published On : Sat, Mar 14th, 2020

हिंगणा टी-प्वाईंटवरील रूफ टॉप रेस्टारंट आणि मी मराठी हॉटेलवर कारवाई

विनापरवानगीचे बांधकाम तोडले, दंडही ठोठावला : आयुक्तांच्या निर्देशावरून कारवाई

नागपूर : नागपूर शहरात विनापरवानगीने होत असलेल्या प्रत्येक अवैध कामांना आळा घालण्यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कडक धोरण स्वीकारले आहे. नागपूर शहरात विनापरवानगीने सुरू असलेल्या सर्व रुफ टॉप रेस्टॉरंटवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यानुसार गेल्या काही वर्षांपासून हिंगणा टी-प्वाईंट येथे एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या आंगन गजाली या रुफ टॉप रेस्टारंटचे सर्वच अवैध बांधकाम तोडले आणि संचालकावर १५ हजार १५ रुपयांचा दंडही ठोठावला.

Advertisement

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. लक्ष्मीनगर झोन अंतर्गत असलेल्या हिंगणा टी-प्वाईंट टाकळी सीम येथील एका इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर रुफ टॉप रेस्टॉरंट गेल्या काही वर्षांपासून सुरू होते. आंगन गजाली असे त्या रेस्टॉरंटचे नाव असून प्रसन्न दारव्हेकर हे त्याचे संचालक आहेत. हे रेस्टॉरंट सुरू करण्यापूर्वी अग्निशमन विभागाची परवानगी घेण्यात आली नाही शिवाय बांधकामासाठीही मंजुरी घेण्यात आली नाही. तेथे लाकडी तट्टे, लाकडी पार्टीशन, बांबू व किचन मध्ये एलपीजी गॅस अशा ज्वलनशील वस्तूंचा वापर होत असल्याचे मनपा अग्निशमन विभागाच्या लक्षात आले. यासाठी २४ नोव्हेंबर २०१६ आणि ३१ मार्च २०१८ ला नोटीस देण्यात आली होती. मात्र या नोटीसकडे दुर्लक्ष करीत संचालकांनी रेस्टॉरंट सुरूच ठेवले. अखेर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार लक्ष्मीनगर झोन आणि अग्निशमन विभागाच्या वतीने कारवाई करीत अवैध असलेले संपूर्ण बांधकाम तोडण्यात आले. याव्यतिरिक्त १५ हजार १५ रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.

Advertisement

‘मी मराठी’वर कारवाई
माता कचेरीनजिक असलेल्या ‘मी मराठी’ ही खानावळसुद्धा विनापरवानगी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. या खानावळीचे बांधकामही लक्ष्मीनगर झोनच्या अधिकाऱ्यांनी पाडले. या खानावळीचे संचालक भूषण मुरारकर आहेत. यासंदर्भात त्यांना २६ जुलै २०१७ रोजी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५५ अंतर्गत नोटीस जारी करण्यात आली होती. परंतु त्यांनी नोटीसकडे दुर्लक्ष केले. अखेर या हॉटेलवर शुक्रवारी मनपाचा बुलडोजर चालला आणि संपूर्ण बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. ह्या दोन्ही कारवाई आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त महेश मोरोणे, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे यांच्या मार्गदर्शनात अभियंता राजू फाले, कृष्णा कोल्हे तसेच अग्निशमन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केली.

२२ रुफ टॉप रेस्टॉरंट आयुक्तांच्या रडारवर
अग्निशमन विभागाने अशा २२ रुफ टॉप रेस्टॉरंटची यादी तयार केली आहे. या सर्व रेस्टॉरंटवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहे. या रेस्टॉरंटमध्ये मे. अमरजीत रिसोर्ट प्रा.लि. हॉटेल सेंटर प्वाईंट (सोमलवाडा), मे. हॉटेल प्राईड (वर्धा रोड), मे. रोसेस्टा एलिट क्लब (यशोधाम एनक्लेव्ह, अजनी), में. ३९ हाईट रुफ टॉवर (मनीषनगर टी-प्वाईंट), मे. सेव्हन सूट रुम ॲण्ड रेस्टारंट, (अभ्यंकरनगर), मे. कोरीएंड लिफ (अभ्यंकरनगर), मे. पटियाला हाऊस (कन्नमवार नगर, वर्धा रोड), मे. मोका स्काय, हॉटेल ट्रॅव्होटेल (कन्नमवार नगर, वर्धा रोड), रुफ ९ रेस्टॉरंट (धरमपेठ कॉफी हाऊस चौक), तुली एम्पेरियल हॉटेल (रामदासपेठ), चील ॲण्ड ग्रीन रेस्टॉरंट आणि लॉज(पूनम आर्केड, सीताबर्डी), सीजन किचन ओपन रेस्टॉरंट (माऊंट रोड, सदर), श्री वली ५०१ ओपन रेस्टॉरंट (ट्राफिक पार्क जवळ, धरमपेठ), कारनेशन ओपन रेस्टॉरंट (माऊंट रोड, सदर), मे. हेवन हायलाईफ रेस्टॉरंट (धंतोली, वर्धा रोड), मे. वऱ्हाडी ठाट, (धंतोली, नागपूर), हॉटेल श्रवण (झाशी राणी चौक), मॅजिक फूड कोर्ट (जरिपटका), मे. व्हिला (अभ्यंकर नगर), दि. टिंबर ट्रंक (अमरावती रोड), दि बिहाईन्ड दि बार (हिंगणा रोड) आदी रेस्टॉरंटवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement