
नागपूर : महाराष्ट्रात यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नसून अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यात सुमारे ४० टक्के पावसाची तूट आहे, तर मराठवाड्यातही ४० ते ४५ टक्के कमी पाऊस झाला असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला. नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केली.
ज्या जिल्ह्यांमध्ये किंवा तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा २० टक्के किंवा त्याहून अधिक पाऊस कमी झाला आहे, तेथे तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, तसेच जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पवार यांनी केली. कापूस आणि सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
कर्जमाफीच्या मुद्द्यावरही पवार यांनी सरकारला घेरले. ५५ लाख शेतकऱ्यांपैकी केवळ १० लाख शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला असून अजूनही सुमारे ४० लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना यंदाचे पीककर्ज मिळण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.
धान खरेदीच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. २०२५-२६ मध्ये राज्यात ३ कोटी ४० लाख क्विंटल धानाचे उत्पादन झाले असून सरकारने त्यातील १ कोटी ४ लाख क्विंटल धानाची २,३६९ रुपये दराने खरेदी केली. छत्तीसगडच्या धर्तीवर महाराष्ट्रातही किमान ३,५०० रुपये दराने धान खरेदी करून बोनस तातडीने जाहीर करावा, अशी मागणी पवार यांनी केली.
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरूनही रोहित पवार आक्रमक झाले. आयोगाच्या अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तीन दिवसांत सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत विद्यार्थी आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला. एमपीएससीवरील विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
एमपीएससीच्या हायपावर समितीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही समिती केवळ जनतेला दाखवण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे की प्रत्यक्षात काम करणार आहे, यावर लक्ष ठेवावे लागेल, असे पवार म्हणाले.
सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. ही निवडणूक बिनविरोध झाल्यास ती अजित पवार यांना श्रद्धांजली ठरेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत बोलताना पवार यांनी त्यांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी एकत्र येऊन केंद्र सरकारकडे घटनादुरुस्तीची मागणी करावी, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, डीजेवरील निर्बंधांबाबत न्यायालयाचा निर्णय मान्य करावा लागेल, मात्र पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देऊन त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली.
पंतप्रधानांच्या कार्यक्रमातील ऑनलाइन नोंदणी आणि तिकीट व्यवस्थेवरही पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. या माध्यमातून नागरिकांचा डेटा राजकीय कारणांसाठी वापरला जाण्याची शक्यता असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली.
गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका करताना पवार यांनी त्यांच्याबाबत आक्षेपार्ह स्वरूपाची राजकीय टिप्पणी केली. सदावर्ते हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असून ते सरकारची भूमिका मांडतात, असा आरोप त्यांनी केला.
एकूणच, नागपुरातील पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी शेतकरी, एमपीएससी पेपरफुटी, धान खरेदी, आरक्षण, डीजे निर्बंध आणि सरकारच्या विविध निर्णयांवरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.




