नागपूर : हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंद्रपूर रेठी गावातील किन्ही परिसरात सुरू असलेल्या अवैध मोहफुल दारूच्या हातभट्टीवर गुन्हे शाखा युनिट-१ने छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून तिघे जण पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वी फरार झाले.
गुन्हे शाखा युनिट-१ला किन्ही परिसरात अवैधरीत्या मोहफुल दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे पथक आणि आरसीपी पथकाने पंचांच्या उपस्थितीत हातभट्टीवर छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी १ हजार ७०० लिटर मोहफुल सडवा, ज्याची किंमत सुमारे १ लाख ७० हजार रुपये, तसेच १८० लिटर तयार मोहफुल हातभट्टीची दारू, अंदाजे ३६ हजार रुपये किमतीची, जप्त केली. मोठ्या प्रमाणातील सडवा घटनास्थळावरून नेणे शक्य नसल्याने पोलिसांनी तो जागेवरच नष्ट केला. तसेच दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिकचे ड्रमही नष्ट करण्यात आले.
या प्रकरणी ४५ वर्षीय ज्ञानेश्वर श्रीराम मारोडी, रा. किन्ही, चंद्रपूर रेठी याला अटक करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच पुर्णीबाई बाल्या राजपूत, अमरदीप अरुण पवार आणि अतुल श्रीराम मारोडी हे तिघे घटनास्थळावरून पसार झाले. फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास हिंगणा पोलीस करीत आहेत.





