
अमरावती : अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गेल्या २० दिवसांपासून दहशत निर्माण करणाऱ्या वाघिणीला अखेर वनविभागाच्या विशेष पथकाने बेशुद्ध करून ताब्यात घेतले. सोमवारी चांदूर बाजार तालुक्यातील शिरजागाव परिसरात ही कारवाई करण्यात आली. वाघिणीच्या पकडीनंतर स्थानिक नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
वनविभागाच्या माहितीनुसार, १७ ऑगस्टपासून या वाघिणीने चार जणांचा बळी घेतला होता. वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून तिचा प्रवास सुरू झाला होता. त्यानंतर ती वरुड, मोर्शी आणि चांदूर बाजार तालुक्यांमध्ये फिरत होती. या काळात तिने पाळीव जनावरांसह नागरिकांवरही हल्ले केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
विशेषतः ६ सप्टेंबर रोजी अवघ्या २४ तासांत दोन जणांचा मृत्यू झाल्याने परिस्थिती गंभीर बनली. नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर वनविभागाने वाघिणीचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली.
या मोहिमेत वनविभागाच्या पथकांनी रात्रंदिवस गस्त घालत परिसरावर लक्ष ठेवले. वाघिणीच्या हालचाली शोधण्यासाठी कॅमेरा ट्रॅप, थर्मल ड्रोन तसेच इतर तांत्रिक साधनांचा वापर करण्यात आला. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देत जनजागृतीही करण्यात आली.
अखेर सोमवारी शिरजागाव परिसरात वाघिणीचा ठावठिकाणा निश्चित करण्यात आला. योग्य नियोजन आणि तांत्रिक साधनांच्या मदतीने तिला कोणतीही मोठी दुर्घटना न घडता सुरक्षितपणे बेशुद्ध करण्यात वनविभागाला यश आले. या कारवाईमुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वाघिणीच्या दहशतीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.




