Published On : Fri, Jun 12th, 2026
By Nagpur Today Nagpur News

रोहित पवार अन्नत्याग आंदोलनावर ठाम; पोलिसांची नोटीस,पंढरपुरातील राजकारण तापले

Advertisement

पंढरपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याचा निर्धार केला आहे. मात्र आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी परवानगी नाकारत नोटीस बजावल्याने पंढरपुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वाहतुकीची अडचण यांचा दाखला देत आंदोलनास परवानगी नाकारली. तसेच पालिकेने अन्य मोकळ्या जागेत आंदोलन करण्याचा पर्यायही सुचविला होता. तरीही रोहित पवार यांनी नियोजित ठिकाणीच आंदोलन करण्याची भूमिका कायम ठेवली आहे.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, या आंदोलनाबाबत पक्षातील काही आमदारांनाही माहिती नसल्याचे समोर आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार उत्तम जानकर आणि अभिजित पाटील यांनी आंदोलनाची पूर्वकल्पना नसल्याचे स्पष्ट केल्याने पक्षांतर्गत समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नोटीस मिळाल्यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर सरकारवर निशाणा साधला. “विठुरायाची पंढरी सर्व भक्तांसाठी खुली असताना सरकार आमच्या मार्गात अडथळे निर्माण करत आहे. संविधानाने दिलेला आंदोलनाचा अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही,” असे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

“अन्नदात्या शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन कोणत्याही दबावामुळे थांबणार नाही. सत्तेचा अहंकार जनतेच्या ताकदीसमोर टिकत नाही,” असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.

रोहित पवार यांच्या आंदोलनामुळे पंढरपुरात राजकीय घडामोडींना वेग आला असून प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता पोलिसांच्या भूमिकेनंतर रोहित पवार पुढे काय भूमिका घेतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.