Published On : Fri, Jul 20th, 2018

नागपूर-मुंबई दुरांतोवर दरोडा , तीन प्रवाशांना लुटले

नागपूर : नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसवर दरोडा घालून प्रवाशांचा लाखावर मुद्देमाल पळविल्याची घटना भुसावळ विभागातील जळगाव ते पाचोरादरम्यान पहाटेच्या सुमारास घडली. तिन्ही प्रवासी नागपुरातील असून एस-२ आणि एस-४ कोचमधून प्रवास करीत होते.

या प्रकरणी मुंबई लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला आहे. या घटनेमुळे दुरांतोतील प्रवासी किती सुरक्षित असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

अजय नारायण वासनिक (६०) रा. नझुल ले-आऊट, बेझनबाग, सूमन गोपाल जैस्वाल (४६) रा. रेवतीनगर, बेसा आणि अनिता सीताराम चिचोरिया रा. वीर चक्र कॉलनी, काटोल रोड अशी प्रवाशांची नावे आहेत. त्यांच्या तक्रारीवरून मुंबई लोहमार्ग पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा नोंदविला आहे. वासनिक मुलासह १२२९० नागपूर -मुंबई दुरांतोच्या एस-४ कोचमधील १७, २० क्रमांकाच्या बर्थवरून प्रवास करीत होते. अनिता चिचोरिया या एस-४ आणि जैस्वाल एस-२ कोचमध्ये होत्या. भुसावळ रेल्वेस्थानकाहून गाडी पुढे निघाल्यानंतर पहाटेच्या सुमारास जळगाव ते पाचोरा दरम्यान सायडिंगला गाडी थांबली.

अज्ञात दरोडेखोरांनी एस-४ च्या खिडकीचे काच उघडून वासनिक यांच्या मुलाच्या डोक्याखाली ठेवलेली लॅपटॉप बॅग, आयपॅड, हार्ड डिक्स, हेड फोन असा एकून ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पळविला.

मुलाने आरडा ओरड केली असता वासनिक जागे झाले. तातडीने दार उघडून दोघांनीही दरोडेखोरांचा पाठलाग केला. मात्र, आरोपींची संख्या अधिक असल्याने ते परतले. तत्पूर्वी दरोडेखोरांनी जैस्वाल यांची सोनसाखळी, पर्स, मोबाईल, घड्याळ, रोख ५०० असा एकून १८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल तर चिचोरिया यांचे २५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला.

दरोडेखोरांनी केली दगडफेक
एस ४ कोचमधील अजय वासनिक यांच्या मुलाने आरडाओरड केल्यानंतर ते आणि त्यांचा मुलगा दरोडेखोरांच्या मागे धावले. परंतु दरोडेखोरांनी त्यांच्यावर दगडफेक केल्यामुळे ते आपल्या कोचमध्ये परत आले. याबाबत त्यांनी गाडीतील टीटीईलाही माहिती दिली. तर गाडीत एकही सुरक्षा रक्षक नसल्याचे त्यांनी सांगितले.

घटनेबाबत अधिकारी अनभिज्ञ
दुरांतोतील नागपूरच्या तीन प्रवाशांना दरोडेखोरांनी लुटले. परंतु या घटनेची भनकही ‘डीआरएम’ कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना नव्हती. प्रसार माध्यमांनी चौकशी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी माहिती घेतली. तर दुरांतो एक्स्प्रेसमधील टीटीई स्टाफनेही घडलेल्या घटनेची सूचना आपल्या वरिष्ठांना दिली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले.