Published On : Mon, Jun 10th, 2019

रस्त्यांवरील खड्ड्यांसदर्भात तातडीने कार्यवाही करा

स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी केली रस्त्यांची पाहणी

नागपूर : पावसाळा जवळ येत आहे त्यामुळे इतर बाबींप्रमाणेच रस्ते सुरक्षेची जबाबदारीही तेवढीच महत्वाची आहे. पावसाळ्यात धोकादायक ठरणारे खड्डे आताच लक्षात आणून ते तातडीने बुजविण्यात यावेत, यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करा, असे निर्देश स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी दिले.

पावसाळ्यात रस्ते अपघाताचे कारण ठरणा-या खड्ड्यांबाबत स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी गांभीर्याने दखल घेत शनिवारी (ता.७) विविध भागातील मार्गांची पाहणी केली. शनिवारी (ता.७) राणी दुर्गावती चौक ते दहीबाजार पूल इतवारी व डिप्टी सिग्नल या भागातील मार्गांची स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी पाहणी करून खड्ड्यांबाबत आढावा घेतला. यावेळी हॉट मिक्स विभागाचे सहायक अभियंता पी.पी. सोनकुसले उपस्थित होते.


पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक मार्ग धोकादायक ठरतात. अनेक ठिकाणी अपघाताच्याही घटना घडतात. पावसाळ्यात नागरिकांना खड्ड्यांमुळे बराच मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच खड्डे बुजविण्याचेही काम होणे आवश्यक आहे. शहरातील विविध भागामध्ये खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. मात्र या कामाला अधिक गती देणे आवश्यक आहे. यासंदर्भात संबंधित विभागाने नियमीत आढावा घेउन कोणत्याही परिसरात नागरिकांच्या खड्ड्यांसंदर्भात तक्रारी राहू नयेत याची दखल घेण्याचेही निर्देश यावेळी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी दिले.

खड्डे बुजविण्याच्या कामात कोणतिही कुचराई होउ नये यामध्ये बेजाबदारपणा होउ नये यासाठी वेळोवेळी आढावा घेण्यात येणार असून संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील ज्या भागामध्ये खराब रस्ते व खड्ड्यांच्या तक्रारी आहेत त्याकडे लक्ष देत पावसाळ्यापूर्वी नागरिकांना दिलासा मिळावा याबाबत योग्य कार्यवाही करा, असेही निर्देश स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी दिले.