Published On : Wed, Jan 15th, 2020

वाहनचालकांनी हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर करावा – जिल्हाधिकारी शेखर सिंह

31 व्या रस्ता. सुरक्षा सप्ताह कार्यशाळेत आवाहन

गडचिरोली:-गडचिरोली जिल्हयामध्ये रस्ते अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी होण्याच्या उद्देशाने प्रत्येक वाहनचालकाने हेल्मेट तसेच सीट बेल्ट वापरावा असे आवाहन जिल्हाधिकारी शेख सिंह यांनी केले. रस्ते सुरक्षा कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी युवा वर्गाला ‘धूम’ स्टाईलचा अंगीकार करु नका, वाहने सावकाश चालवा व आपला जीव वाचवा तसेच नियमांचे पालन करा असा संदेश दिला.

रस्ते अपघात कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयामार्फत संपूर्ण देशभर जनजागृती सप्ताह आयोजित केले जात आहेत. जिल्हयात 11 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले जात आहे.

त्या अनुषंशाने शालेय विद्यार्थी व विविध वाहन चालक संघटना यांची कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेचे आयोजन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्यावतीने करण्यात आले. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विवेक मिश्रा, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, पोलिस विभाग वाहतूक शाखेचे श्री उदार उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविकामध्ये रविंद्र भुयार यांनी जिल्हयात राबविण्यात येत असलेल्या रस्ते सुरक्षा बाबतचे विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे तपशील सांगितले. सचिन अडसूळ यांनी रस्ते अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी तसेच अपघातांची कारणे विशद केली. या कार्यशाळेला उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार एस.एन.वाघमारे यांनी मानले तर सुत्रसंचलन हर्षल बदकल यांनी केले.