Published On : Sat, Jan 11th, 2020

रस्ता सुरक्षा समितीची बैठक गडकरींच्या अध्यक्षतेखाली संपन्न

नागपूर शहरात ब्लॅक स्पॉटस् अर्थात अपघातप्रवण स्थळात संबंधित यंत्रणांनी सहा महिन्याच्या आत सुधारणा घडवून आणावी अन्यथा या जागावर होणा-या अपघासाठी संबंधित यंत्रणांचे अधिकारी जबाबदार राहतील , अशी सूचना केंद्रीय रस्ते, वाहतूक महामार्ग मंत्री आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली.

रस्ता सुरक्षा समितीची बैठक आज त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक वनामती सभागृहातील प्रशासकीय सभागृहात झाली त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी या समितीचे सदस्य सचिव व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, राज्याचे पशुसंवर्धन विकास मंत्री सुनील केदार, महापौर संदीप जोशी व राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे प्रामुख्याने उपस्थित होते. 31 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन आज केल्यानंतर गडकरींनी या बैठकीद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

प्रादेशिक परिवहन कार्यालय ,पोलीस विभाग बांधकाम विभाग या यंत्रणांनी नागपूर शहरातील 82 ब्लॅक स्पॉट पैकी 66 मध्ये सुधारणा केली आहे. उर्वरित ब्लॅक स्पॉटस् ची माहिती ही वाहतूक पोलिस विभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देऊन मध्ये 6 महिन्याच्या आत त्यात सुधारणा करावी असे आदेश गडकरींनी यावेळी दिले.

स्वयंसेवी संस्था जनआक्रोश च्या वतीने शहरातील काही चौकामध्ये सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग ,डिव्हायडर यासंदर्भातील त्रुटी बाबत सांगितले असताना संबंधित स्वयंसेवी संस्थांना त्यांच्या मार्गदर्शक सूचना व निरिक्षणे व्हीएनआयटी स्थित वाहतूक अभियांत्रिकी विभागामार्फत प्रमाणित करून शासन यंत्रणेला सादर कराव्यात असे त्यानी यावेळी सांगितले .

पशुसंवर्धन विकास मंत्री सुनील केदार यांनी कळमेश्वर येथील सावनेर-वाकी च्या ब्लॅक स्पॉटच्या प्रलंबित कामाबाबत उल्लेख केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिका-यांनी सदर ब्लॅक स्पॉट पुन्हा निरीक्षण करून सुधारण्यासाठी कारवाई करू असे सांगितले.

संसदेमध्ये पारित झालेल्या मोटार वाहन कायद्यामध्ये रस्ते सुरक्षा संदर्भात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आर्थिक मदत करण्यासाठी तरतूद केली आहे. ऑटो डीलर्स असोसिएशनने सुद्धा अशा स्वयंसेवी संस्थांना मदत करावी, असे गडकरी यांनी यावेळी सुचवले.

या बैठकीस वाहतूक पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे अधिकारी तसेच ऑटो डीलर्स असोसिएशन, जिल्हा सुरक्षा समितीचे पदाधिकारी व जनआक्रोश समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.