नागपूर : रस्त्यावर साइड देण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाल्याची घटना नागपुरातील लिबर्टी चौक परिसरात घडली. चार युवकांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (ST) बसचालकाला घेरून शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिबर्टी चौकाजवळ बसचालक आणि काही युवकांमध्ये साइड देण्यावरून वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर युवकांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही वेळातच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. चार युवकांनी बसचालकाला घेरून त्याच्यावर हात उचलला. रस्त्यावर सुरू असलेल्या या प्रकारामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्येही आश्चर्य व्यक्त करण्यात आले. काही नागरिकांनी संपूर्ण घटना मोबाईलमध्ये चित्रित केली.
घटनेची माहिती मिळताच सदर पोलिसांना कळविण्यात आले. मात्र, बीट मार्शल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच संबंधित युवक तेथून पसार झाले. विशेष म्हणजे, या प्रकरणात अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती आहे.
रस्त्यावर किरकोळ कारणावरून वाद झाल्यास कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. अशा घटनांमुळे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता या व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलीस पुढे काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.




