नागपूर: नागपूर महानगरपालिकेतर्फे ७ मे ते २० जुन या दरम्यान नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत शहरातील नागनदी, पिवळी नदी, पोरा नदी या तिन्ही नद्या संपूर्णपणे स्वच्छ करण्याचा मनपाचा निर्धार आहे. यासंदर्भातील पूर्व तयारीचा आढावा महापौर नंदा जिचकार यांनी गुरूवारी (ता.२६) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित बैठकीत घेतला.
यावेळी स्थायी समिती सभापती विक्की कुकरेजा, सत्तापक्ष नेता संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, तांत्रिक सल्लागार विजय बनगिरवार, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मागील वर्षी केलेल्या कामाचा आढावा महापौरांनी अधिका-यांमार्फत घेतला. मागील वर्षी तिन्ही नदी मिळून जवळपास ७२ हजार टन गाळ नदीतून काढण्यात आला होता. यावर्षीही गाळ व माती काढण्याचे काम करावयाचे आहे. शहरात तीन नद्या वाहत आहे. नागनदीची लांबी १८ किमी, पिवळी नदीची १७.५० किमी, पोरा नदीची लांबी १२ किमी आहे. यामध्ये १८ टप्प्यांमध्ये कामाची आखणी केली असल्याची माहिती अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी दिली.
मागील वर्षी राहिलेला भाग या वर्षी सुटता कामा नये. त्याठिकाणचा गाळ व माती काढण्यात यावी, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. या कामासाठी आवश्यक त्या स्वयंसेवी संस्थाची मदत घेण्यात यावी, अशा सूचना महापौरांनी केल्या.
मागील वर्षी नासुप्र, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, पटबंधारे विभाग, कंत्राटदार असोसिएशन यांच्या मार्फत उपकरणे मागविली होती. यावर्षीदेखील त्यांच्याकडून उपकरणे मागवून घेण्यात यावी, असे निर्देश आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले. नदीतून काढलेला गाळ हा त्याच ठिकाणी साचू देऊ नका, त्या गाळाला संकलित करून योग्य जागी पाठविण्याची व्यवस्था लगेच करण्यात यावी, असेही आयुक्त अश्विन मुदगल यांनी सांगितले.
बैठकीला आरोग्य अधिकारी (स्वच्छता) मनपाचे सर्व कार्यकारी अभियंता, सर्व झोन सहायक आयुक्त, प्रामुख्याने उपस्थित होते.
