Published On : Thu, Apr 26th, 2018

आसीनगर झोनमधील नगरसेवकांच्या पाणी समस्येची महापौरांनी घेतली दखल

Ashinagar Zone

नागपूर: आसीनगर येथील नगरसेवकांच्या समस्येची महापौर नंदा जिचकार यांनी गांभीर्याने दखल घेत १५ दिवसाच्या आत नगरसेवकांच्या सर्व तक्रारी निकाली काढण्याचे निर्देश ओसीडब्लूच्या अधिकाऱ्यांना दिलेत.

नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, जलप्रदाय समितीच्या झोननिहाय बैठकीअंतर्गत गुरूवारी (ता.२६) आसीनगर झोन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, दुर्बल घटक समिती सभापती महेंद्र धनविजय, उपसभापती श्रद्धा पाठक, झोन सभापती वंदना चांदेकर, समिती सदस्य संजय बुर्रेवार, माजी सभापती भाग्यश्री कानतोडे, बसपा गट नेता मोहम्मद जमाल, नगरसेवक मनोज सांगोळे, जितेंद्र घोडेस्वार, तौफिक शेख इब्राहिम, दिनेश यादव, नगरसेविका वैशाली नारनवरे, विरंका भिवगडे, मंगला लांजेवार, नसिम बानो शेख मोहम्मद इब्राहिम प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी महापौरांनी पाणी समस्येसंदर्भात झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभागांचा प्रभागनिहाय आढावा घेतला. नगरसेवकांनी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे संताप व्यक्त करत पाण्याच्या समस्या महापौरांपुढे मांडल्या. वारंवार तक्रारी करूनदेखिल ओसीडब्लूचे अधिकारी त्याची गांभार्याने दखल घेत नाही. झोनमधील आहुजा नगर, कस्तुरबा नगर, दयानंद कॉलनी याठिकाणी पाणी नियमित येत नसल्याची तक्रार महेंद्र धनविजय यांनी केली. त्यावर बोलताना महापौर नंदा जिचकार यांनी पाणी नियमित द्यावे, स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश दिले.

तक्षशिला नगर येथे पाणी गढूळ येत आहे. त्या गढूळ पाण्याचे नमुने नगरसेवक मनोज सांगोळे यांनी महापौरांना दाखविले हे बघून महापौरांनी संताप व्यक्त करीत ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थानिक नागरिकांच्या समस्यांना नगरसेवकांना तोंड द्यावे लागते. नगरसेवकांसोबत समन्वयाने कामे करावी. पुढील १५ दिवसाच्या आत सर्व तक्रारी निकाली काढण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

बैठकीला निगम सचिव हरिश दुबे, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, ओसीडब्ल्यूचे राजेश कारला, प्रवीण शरण यांच्यासह ओसीडब्ल्यू व मनपाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टिल्लू पंप लावणाऱ्यांवर होणार फौजदारी गुन्हा दाखल : पिंटू झलके
टिल्लू पंप लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी दिली. टिल्लू पंप लावणे हा गुन्हा असून जे टिल्लू पंप लावताना आढळतील त्यांच्यावर एफआयआर दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.