नागपूर : नागपूर शहरात डेंग्यू आणि मलेरियासारख्या जीवघेण्या आजारांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नागपूर महानगरपालिका (NMC)ने १ ऑगस्टपासून शहरात घेतलेल्या आरोग्य सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुमारे १.४६ लाख घरांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ७,९८६ घरांमध्ये मच्छरांचे लार्वा आढळले आहेत.
यापूर्वी जून-जुलै महिन्यांत केलेल्या तपासणीत २.८५ लाख घरांची पाहणी करण्यात आली होती, ज्यामध्ये १२,०२१ घरांमध्ये लार्वा सापडले होते. या आकडेवारीवरून शहरातील स्वच्छता व्यवस्थेची आणि नागरिकांच्या जागरूकतेची गंभीर स्थिती समोर आली आहे.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने लार्वा निर्मूलनासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील विविध भागांमध्ये फॉगिंग, स्प्रे आणि लार्वा नष्ट करणाऱ्या औषधांचा वापर करण्यात येत आहे.
सर्वेक्षणात असेही दिसून आले की, घरांतील कुलर, पाण्याच्या टाक्या, फुलझाडांचे गमले, जुने भांडे, तसेच मोकळ्या भूखंडांमध्ये साचलेले पाणी मच्छरांच्या वाढीस कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे नागरीकांनी आपल्या परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन NMCने केले आहे.
शहरवासीयांनी काय काळजी घ्यावी?
आठवड्यातून एकदा कुलर साफ करावा
पाण्याच्या टाक्या झाकून ठेवाव्यात
मोकळ्या जागेत पाणी साचू न देता वेळेवर कचरा साफ करावा
गमले किंवा भांड्यात पाणी साठू देऊ नये
सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसराची जबाबदारी घेत स्वच्छतेकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.