नागपूर :शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नुकत्याच कुकरेजा सनसिटी (दीक्षित नगर) येथे घडलेल्या खूनाच्या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी नागपूरचे पोलीस आयुक्त यांना थेट निवेदन सादर केलं आहे.
या निवेदनात रहिवाशांनी कापिल नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरातील वाढत्या असुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या सोसायटीसमोर भरदिवसा एका व्यक्तीचा निर्घृण खून झाला. विशेष म्हणजे केवळ ५० मीटर अंतरावर पोलीस चौकी असतानाही आरोपीने गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडवली, यावरून गुन्हेगारांना पोलीस यंत्रणेचा कोणताही धाक राहिलेला नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.
ट्राफिक आणि साप्ताहिक बाजारही ठरत आहेत डोकेदुखी-
निवेदनात पुढे नमूद केलं आहे की खुनाच्या ठिकाणी जवळच ऑटो स्टँड असून तिथे प्रचंड वाहतूक कोंडी होते. ट्राफिक विभागाने यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, परिसरात दर बुधवारी भरत असलेल्या साप्ताहिक बाजारामुळे मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण होतात. पूर्वी हा बाजार अंतर्गत रस्त्यावर भरायचा, परंतु गेल्या काही वर्षांत तो थेट मुख्य रस्त्यावर हलवण्यात आला आहे. बाजारात गुंड प्रवृत्तीचे लोक सक्रीय असून, महिलांना तिथून जाणंही धोकादायक वाटतंय, असा आरोपही रहिवाशांनी केला आहे.
पोलिसांची भूमिका संशयास्पद?
निवेदनात असेही नमूद आहे की घटनेच्या दिवशी ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई व्हावी, जेणेकरून इतर अधिकारीही आपल्या जबाबदाऱ्या गांभीर्याने पार पाडतील. कपिल नगर चौकात नियुक्त पोलीस कर्मचारी केवळ नावापुरते तैनात असून, ट्रक आणि मोठ्या वाहनांच्या बेकायदेशीर पार्किंगकडे कोणीही लक्ष देत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
प्रशासनाकडून तात्काळ कारवाईची मागणी-
रहिवाशांनी पोलीस आयुक्तांकडे मागणी केली आहे की, वरील सर्व समस्यांवर तत्काळ पावले उचलून नागरिकांना सुरक्षिततेचा ठाम विश्वास द्यावा. कुकरेजा सनसिटीसारख्या वस्तीमध्ये भरदिवसा खून होणं आणि त्यावर पोलीस यंत्रणेची अपुरी प्रतिक्रिया ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.