नागपूर: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारकडे निधी नाही, अशा आशयाची टीका केल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. एक्स (पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बावनकुळे यांनी लिहिलं की, सपकाळ अजून खूप छोटे आहेत, मोठं होण्यासाठी त्यांना अजून लांबचा प्रवास करावा लागेल,असा टोला लगावला.
हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर आरोप करत पोस्ट केली होती की, “राज्य आर्थिक संकटात आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थयात्रा योजना बंद झाली, लाडली बहिणींना दरमहा २१०० रुपये दिले गेले नाहीत, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आलेले नाही आणि चोंडी येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंडप व इतर व्यवस्था यावर १५० कोटी रुपये वाया घालवले जात आहेत. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा खासदार सुनील तटकरे यांच्या घरी आले होते, तेव्हा हेलिपॅडवर १.५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. सरकारमधील सत्ताधारी पंचतारांकित सुखसुविधा घेत आहेत आणि जनतेला मात्र आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे.”
या आरोपांवर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, सपकाळ अजून खूप छोटे आहेत… त्यांना अजून लांबचा प्रवास करावा लागेल. पण त्यासाठी आधी त्यांना आपलं बालिश वागणं थांबवावं लागेल. सार्वजनिक बांधकाम विभाग, अहिल्यानगर यांनी चोंडी येथील २१ एप्रिल रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी जाहीरात प्रसिद्ध केली होती. या जाहीरातीत स्पष्टपणे १.५ कोटी रुपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे.
बावनकुळे पुढे म्हणाले, ही जाहीरात पुढारी आणि लोकमत या दोन वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली. पुढारीमध्ये ती योग्य प्रकारे छापली गेली. मात्र, लोकमतमध्ये शेवटच्या दोन शून्यांपूर्वी बिंदू न लागल्यामुळे ती १५० कोटींची असल्याचं भासू लागलं. ही एक तांत्रिक चूक होती आणि ती वृत्तपत्राच्या बाजूने अनावधानाने झाली आहे. जाहीरात प्रसिद्ध करण्याच्या आदेशात कोणतीही चूक नाही.
सपकाळ यांच्यावर निशाणा साधत बावनकुळे म्हणाले, या साऱ्या गोष्टी असूनही केवळ माध्यमांमध्ये राहण्यासाठी त्यांनी अशा बालिश गोष्टी केल्यावर त्यांच्याबद्दल दया येते. त्यांच्या विषयी दु:ख व्यक्त करण्याव्यतिरिक्त काही करता येत नाही.