नागपूर: अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) मा. निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर परिक्षेत्रातील गुन्हेगारी नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था, तसेच नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक पोलीस भवन, सिव्हिल लाईन, नागपूर येथे पार पडली.
या बैठकीस विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. संदीप पाटील (नागपूर परिक्षेत्र) यांच्यासह नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. हर्ष पोद्दार, भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन, चंद्रपूरचे श्री. मुम्मका सुदर्शन, वर्ध्याचे श्री. अनुराग जैन, नागपूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक श्री. अनिल म्हस्के, तसेच विविध जिल्ह्यांच्या विशेष शाखा व स्थानिक गुन्हे शाखांचे निरीक्षक उपस्थित होते. भंडारा, चंद्रपूर, नागपूर ग्रामीण आणि वर्धा जिल्ह्यांतील इतर वरिष्ठ अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले.
बैठकीत नागपूर परिक्षेत्रातील गुन्हेगारीची स्थिती, कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. चोरीच्या गुन्ह्यांतील जप्त मालाच्या परतवाटीच्या कामगिरीचे तसेच गुन्ह्यांच्या निपटाऱ्यात आणि दोषसिद्धीच्या उच्च प्रमाणाबद्दल सर्व जिल्ह्यांचे अभिनंदन करण्यात आले.
नवीन भारतीय न्यायसंहितेतील कलम १११ आणि ११२ चा प्रभावी वापर होत असल्याचे निरीक्षण नोंदवत याची विशेष प्रशंसा करण्यात आली. अर्ज निपटाऱ्यात नागपूर परिक्षेत्र आघाडीवर असल्याबद्दलही गौरव व्यक्त करण्यात आला.
NDPS (अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा) अंतर्गत कठोर कारवाईची गरज अधोरेखित करत गुप्ता यांनी स्पष्ट केले की, “विकसित भारत आणि महाराष्ट्र घडवायचा असेल, तर अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांबाबत शून्य सहिष्णुतेची भूमिका अंगीकारावी लागेल.” भंडारा पोलीस दलाने NDPS बाबतीत दाखवलेल्या भरीव कामगिरीचे खास करून कौतुक करण्यात आले.
शिवाय, जप्त मालमत्ता फिर्यादीला लवकरात लवकर परत देण्यात येणाऱ्या प्रयत्नांबाबतही अधिकारीवर्गाचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
ही बैठक केवळ गुन्हेगारी नियंत्रणासाठी नव्हे तर पोलिसिंगच्या कार्यक्षमतेचा आढावा घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. आनेक सकारात्मक मुद्द्यांवर चर्चा होऊन आगामी काळातील धोरणांसाठी दिशादर्शक ठरली.