मुंबई :गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा जवळीक दिसून आली आहे. शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे बुधवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले आणि गणरायाचं दर्शन घेतलं.
दरवर्षीप्रमाणे यंदाही राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसांचा गणपती बसवण्यात आला आहे. यासाठी राज ठाकरे यांनी स्वतः उद्धव ठाकरे यांना फोन करून खास निमंत्रण दिलं होतं. हे निमंत्रण स्वीकारत उद्धव ठाकरे कुटुंबासह दर्शनासाठी आले असून, ते आज दुपारी राज ठाकरे यांच्या सोबत जेवणाचाही मान राखणार आहेत.
याआधी २७ ऑगस्टला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर भेट देऊन गेले होते. अनेक वर्षांनी त्यांनी मातोश्रीवर पाऊल ठेवले होते. त्यानंतर आता उद्धव ठाकरे स्वतः शिवतीर्थवर गेले असल्याने दोन्ही भावांतील संबंध पुन्हा दृढ होत असल्याचे चित्र दिसत आहे.
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गट एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या या भेटींमुळे या चर्चांना अधिक जोर मिळत आहे.
राज ठाकरे यांनी तीन वर्षांपूर्वी दादरच्या कृष्णकुंजऐवजी नव्या शिवतीर्थमध्ये वास्तव्य सुरू केले. आलिशान सजावटीमुळे शिवतीर्थ हे राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत असते. मात्र, उद्धव ठाकरे पहिल्यांदाच या निवासस्थानी आले आहेत. त्यामुळे दोन्ही भावांच्या राजकीय समीकरणांमध्ये नवा टप्पा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.